esakal | एकल स्तंभावर उभा राहणार कोस्टल रोडचा पूल; भारतातील पहिलाच प्रयोग

बोलून बातमी शोधा

एकल स्तंभावर उभा राहणार कोस्टल रोडचा पूल; भारतातील पहिलाच प्रयोग
एकल स्तंभावर उभा राहणार कोस्टल रोडचा पूल; भारतातील पहिलाच प्रयोग
sakal_logo
By
समीर सुर्वे -सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नरीमन पॉईंट ते वरळीपर्यंत १५.६६ किलोमीटरच्या सागरी किनारी मार्गासाठी समुद्रात २.१० किलोमीटर लांबीचे पूल बांधण्यात येणार आहे. हे पूल 'एकल स्तंभ'वर म्हणजेच Mono-pile Technology उभारले जाणार आहेत. विशेष म्हणजे या तंत्राचा भारतात पहिल्यांदाच वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे समुद्राच्या तळाचा कमीत कमी वापर व त्याचसोबत पैसे व वेळ या दोहोंची बचत होणार आहे, असा दावा महानगर पालिकेने केला आहे.

पारंपरिक बहुस्तंभीय पद्धतीने पुलाचे बांधकाम करण्यासाठी प्रत्येक खांबासाठी चार आधार स्तंभ उभारावे लागतात. मात्र, या तंत्रज्ञानाचा वापर केल्यावर जेवढे खांब तेवढेच स्तंभ उभारावे लागणार आहेत. त्यामुळे वेळ आणि पैशांची बचत होते. सागरी किनारी मार्गातील पुलांसाठी १७६ खांब उभारायचे असल्यास त्यासाठी ७०४ स्तंभ उभारावे लागले असते. मात्र, महानगर पालिकेने आता केलेल्या नव्या तंत्रामुळे १७६साठी तितकेच स्तंभ उभारले जाणार आहेत. "यासाठी विदेशी तज्ज्ञांचा सल्लादेखील घेतला जाणार आहे. इतकंच नाही तर, विदेशातील काही तज्ज्ञ तंत्रज्ञ हे काम स्वत:च्या उपस्थितीत करत आहेत", असं प्रकल्प प्रमुख अभियंता सुप्रभा मराठे यांनी सांगितलं.

अभ्यास करुनच निर्णय

हा प्रयोग पहिल्यांदाच भारतात होणार आहे. त्यामुळे थेट निर्णय न घेता महानगर पालिकेने त्याचा शास्त्रीय अभ्यास केला आहे. जगात ज्या ठिकाणी अशा प्रकारे पुल उभारण्यात आले आहेत. अशा पुलांचा अभ्यास करुन पालिकेच्या अभियंत्यांच्या पथकाने तसेच संबंधित सल्लागराने सविस्तर अभ्यास करुन अंतिम निर्णय घेतला आहे.पालिका उभारत असलेल्या या स्तंभागाचा व्यास हा 2.5,3 आणि 3.5 मिटर आहे.प्रत्येक ठिकाणची गरज लक्षात घेऊन हा आकार ठरविण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

चाचणी होणार

अशा प्रकारचे स्तंभ उभारण्याची यंत्रसामुग्री भारतात उपलब्ध नाही.त्यामुळे युरोपातून ही यंत्रसामुग्री आयात करण्यात आली आहे. त्याच बरोबर प्रत्यक्ष बांधकामापूर्वी पालिकेने तीन चाचणी स्तंभ उभारण्यास सुरुवात केली आहे. वरळी येथील अब्दुल गफार खान मार्गावरील बिंदू ठाकरे चौकाजवळील समुद्रात हे चाचणी स्तंभ उभारण्यात येत आहे. जुलै अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार असून त्यानंतर या खांब्याची क्षमता तपासण्यासाठी वेगवेगळ्या टनांचा दाब उभ्या व आडव्या पध्दतीने देण्यात येणार आहे.

संपादन : शर्वरी जोशी