Mumbai : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीवर 24 तास करडी नजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Pune-Mumbai Expressway

Mumbai : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीवर 24 तास करडी नजर

मुंबई : मुंबई पुणे महामार्गावर वाहतूकीस शिस्त लागावी तसेच अपघातांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यासाठी 1 डिसेंबर पासून ६ महिन्यांकरिता विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिले. तब्बल सहा महिने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रादेशिक परिवहन आधिकारी आणि महामार्ग पोलीसांची 24 तास करडी नजर ठेवण्यात येणार असून, त्यासाठी पथक नेमण्यात येणार आहे.

एका तपासणी पथकात किमान दोन मोटार वाहन निरीक्षक दर्जाचे अधिकारी राहणार असून, या पथकाचे नियंत्रक अधिकारी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी असतील, तपासणी पथके दर्शवल्यानुसार पाळीनिहाय कार्यरत राहणार आहे. यामध्ये वेग मर्यादेचे उल्लंघन करून धावणारी वाहने, चुकीच्या मार्गिकेतून जाणारी तसेच चुकीच्या पद्धतीने मार्गिका बदलणारी वाहने, बिना सीटबेल्ट जाणारी वाहन, रस्त्याच्या कडेना. अवैधरित्या पार्किंग केलेली वाहने, तपासणी दरम्यान महामार्गावरील ब्लॅकस्पोटना वारंवार भेटी देवून या ब्लॅकस्पॉट्सची दुरुस्ती करून घेण्यावर भर देण्याच्या सुचना सुद्धा देण्यात आल्या आहे.

त्याशिवाय प्रत्येक तपासणी पथकाच्या प्रभारी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दररोज सकाळी 10 वाजता मागील 24 तासात त्यांच्या पथकांनी केलेल्या कारवाईचा तपशील अद्ययावत करावा लागणार आहे. तसेच दर सोमवारी सकाळी 10 वाजता आठवड्याच्या कामगिरीचा अहवाल परिवहन आयुक्त यांना सादर करावा लागणार आहे, तपासणी दरम्यान इंटरसेप्टर वाहनांवरती पब्लीक एड्रेस सिस्टिमचा वापर करून त्याद्वारे वाहन चालकांना रहदारीचे नियम पाळण्यासंबंधी वारंवार उद्घोषणा सुद्धा केल्या जाणार आहे. तर तपासणी मोहीमेवर देखरेख, नियंत्रण व मार्गदर्शन करण्यासाठी रस्ता सुरक्षा कक्षाचे उप परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्यावर काम सोपवण्यात आले आहे.

मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गांवरील अपघातांची संख्या

द्रुतगती महामार्गावर 2018 मध्ये वर्षभरात एकूण 359 अपघात झाले असून, त्यापैकी 100 जिवघेण्या अपघातांमध्ये 114 लोकांचा बळी गेला होता. त्याप्रमाणे 2019 मध्ये एकूण अपघात 353 त्यापैकी 74 जिवघेण्या अपघातांमध्ये 92 मृत्यु, 2020 मध्ये कोरोनाच्या महामारीमूळे एकूण अपघातांमध्ये घट होऊन एकूण 161 अपघात झाले होते तर 62 जिवघेण्या अपघातांमध्ये 66 लोकांना जिव गमवावा लागला. 2021 मध्ये 200 एकूण अपघात झाले तर 71 जिवघेण्या अपघातांमध्ये 88 मृत्यु झाले आहे. तर यावर्षी जानेवारी ते आॅक्टोंबर या दरम्यान 10 महिन्यात 168 अपघातांची नोंद झाली असून. त्यापैकी 56 जिवघेण्या अपघातांमध्ये 68 लोकांचा अपघाती मृत्यु झाला आहे.