
मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांच्या पदांच अनुशेष भरून काढण्यासाठी मुंबई महानगरपीलिकेत प्रक्रियेला वेग आला आहे.
Mumbai News : महानगरपालिकेच्या १६ सहाय्यक आयुक्तांची भरती एमपीएससीच्या माध्यमातून
मुंबई - मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांच्या पदांच अनुशेष भरून काढण्यासाठी मुंबई महानगरपीलिकेत प्रक्रियेला वेग आला आहे. या रिक्त पदांच्या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) च्या माध्यमातून जागा भरण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. लवकरच या १६ पदासाठीच्या बदल्यास सहाय्यक आयुक्त नेमले जातील.
साधारणपणे महिन्याभरात ही प्रक्रिया राबवून याठिकाणच्या रिक्त पदांची पूर्तता करण्यात येईल अशी माहिती पालिकेच्या अधिकार्याने दिली. या पदासाठीच्या मुलाखतीनंतर ही रिक्त पदांची भरती करण्यात येईल. कोरोनाच्या आधीपासून म्हणजे २०१६ पासून ही सहाय्यक आयुक्त पदाच्या दर्जाच्या अधिकार्यांची भरती झालेली नाही.
मुंबई महानगरपालिकेतील अनेक अधिकाऱ्यांना बढती मिळाली आहे. तर काही अधिकारी वर्ग निवृत्तीनंतर मोठी पोकळी या पदाच्या जागांसाठी निर्माण झाली आहे. जवळपास १२ वॉर्डात या सहाय्यक आयुक्तांची नेमणूक करण्यात येईल. तर अतिरिक्त प्रकल्पांसाठीही अधिकारी वर्गाची वाणवा आहे. सध्या तात्पुरत्या पद्धतीने कार्यकारी अभियंता वर्गाला पदोन्नती देतानाच विविध वॉर्डात या पदाचा कार्यभार देण्यात आला आहे.
अनेक ठिकाणी सहाय्यक आयुक्तांच्या अंधाधुंद पद्धतीने बदल्या करण्यात आल्याचे प्रकार समोर आले होते. त्यामध्ये स्थानिक राजकीय दबावामुळेही या बदल्या करण्यात आल्या होत्या. काही अधिकारी वर्गाच्या अल्पावधीत बदल्या झाल्याने सामान्य प्रशासन विभागाच्या कामकाजावर राजकीय नेत्यांनीही टीकास्त्र सोडले होते. आता थेट एमपीएससीच्या माध्यामातून या जागा भरण्यासाठीच्या प्रक्रियेमुळे त्याचा परिणाम हा पालिकेच्या कारभारावर सकारात्मक होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.