Mumbai News : राज्याच्या संचलन सोहळ्यात महानगरपालिका सुरक्षा दल पथकास द्वितीय क्रमांक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Municipal Security Force team won second place in maharashtra

Mumbai News : राज्याच्या संचलन सोहळ्यात महानगरपालिका सुरक्षा दल पथकास द्वितीय क्रमांक

मुंबई : महाराष्ट्र दिनी राज्यस्तरिय पथ संचलन सोहळ्यादरम्यान सर्वोत्कृष्ट पथ संचलनाचे द्वितीय पारितोषिक बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा दलास प्रदान करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे आयोजित एका विशेष सोहळ्यादरम्यान अप्पर पोलिस

महासंचालक (प्रशासन) श्री. अनुपकुमार सिंह यांच्या हस्ते आणि पोलिस सह आयुक्त (प्रशासन) मुंबई श्री. एस. जयकुमार आणि अप्पर पोलिस आयुक्त (सशस्त्र पोलिस दल) श्रीमती आरती सिंह यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले आहे.

दरवर्षी महाराष्ट्र दिनी म्हणजेच दिनांक १ मे रोजी दादर पश्चिम परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनाचा मुख्य सोहळा आयोजित होतो.

माननीय राज्यपाल महोदयांच्या उपस्थितीत साज-या होणा-या या सोहळ्यादरम्यान विविध गणवेशधारी दलांच्या पथकांचे पथसंचलन देखील मोठ्या जोशात व उत्साहात होत असते. यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा दलाचाही सहभाग असतो.

महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे २०२२ रोजीच्या पथ संचलनादरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ७२ सुरक्षा रक्षकांचा समावेश असलेल्या पथकानेही भाग घेतला होता. या पथकाचे नेतृत्व विभागीय सुरक्षा अधिकारी श्री. सुनील होळकर, सहाय्यक सुरक्षा अधिकारी श्री. संदीप मुळे व सहाय्यक सुरक्षा अधिकारी श्री. नितीन महाजन यांनी केले होते.

संचलनाकरिता महानगरपालिकेच्या सुरक्षा दलाचे प्रशिक्षक श्री. छोटू साळुंखे, श्री. रविंद्र परदेशी व श्री. दिगंबर अमोदकर यांनी पथ संचलनात सहभागी झालेल्या सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण दिले व सराव करवून घेतला. हे तिनही प्रशिक्षक भारतीय सैन दलातील सेवानिवृत्त जवान आहेत.