ऑक्सिजन पार्लरनंतर आता मुंबईतील CSMT स्टेशजवळ तयार होणार 'अनोखं' गार्डन, जाणून घ्या खासियत

कुलदीप घायवट
Monday, 22 February 2021

मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या हेरिटेज लेनमध्ये 'हर्बल गार्डन' तयार करण्याचे काम सुरू आहे.

मुंबई, ता. 21 : मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या हेरिटेज लेनमध्ये 'हर्बल गार्डन' तयार करण्याचे काम सुरू आहे. ज्यात सुमारे 70 प्रकारची हर्बल वनस्पती असणार आहेत.
मध्य रेल्वे प्रशासनाकडून पर्यावरण संवर्धनावर विशेष काम केले जाते. अनेक पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यात येतात. यातूनच सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 18 बाहेर हेरिटेज लेन आहे. या लेनमध्ये मध्य रेल्वेचा ऐतिहासिक वारसा असलेले इंजिन, क्रेन आणि  रेल्वेचे प्रिंट मशीनसह अनेक वस्तू प्रवाशांना पाहण्यासाठी ठेवण्यात आलेली आहे. या वस्तूच्या आजूबाजूला बरीच मोकळी जागा होती. त्या जागेवर 'हर्बल गार्डन' मध्य रेल्वेकडून तयार करण्यात येत आहे. या गार्डनमध्ये बेहडा, हिरडा, शतावरी, भृंगराज, सदाबहार, तुळस, आवळा, अश्वगंधा, वारपाठा, अमलतास, ग्वारपाठा, तेजपान आणि तुळशी यासारख्या 70 वनस्पतींची लागवड करण्यात येत आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून मिळाली आहे. 

महत्त्वाची बातमी : महाविकास आघाडीतील नेत्यांचे दौरे आणि कार्यक्रम रद्द ! 'शिक्षण मंत्रालय @ मुंबई'ही कोरोनामुळे रद्द

वनस्पती वृक्षांची वाढती मागणी आणि त्याच्या औषधी गुणांमुळे सीएसएमटीमध्येही आता हर्बल गार्डन सुरू केले जाणार आहे. हाउस किपिंग विभागाद्वारे हे गार्डन तयार केले जाणार आहे. गार्डन तयार करण्यासाठी 1 लाख रुपये खर्च येणार आहे. गार्डन तयार केल्यानंतर या ठिकाणी शैक्षणिक सहलीद्वारे विद्यार्थ्यांना औषधी वनस्पतींचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. गार्डनमध्ये 70 प्रकारची झाडे लावण्यात येणार आहेत. 

पर्यावरण रक्षणासाठी 'झाडे वाढवा,पर्यावरण वाचावा' ही मोहीम देशभरात सुरु आहे. मध्य रेल्वेकडून सुद्धा पर्यावरणाचा रक्षणासाठी अनेक  महत्वपूर्ण योजना राबविल्या आहे. यापूर्वी मध्य रेल्वे हवा शुद्धीसाठी रेल्वे स्थानकात ऑक्सिजन पार्लर (रोप वाटिका ) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.  मध्य रेल्वेच्या नाशिक रोड स्थानकांत सुरु केली होती. या रोप वाटिकेत नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन,(नासा) कडून मान्यता प्राप्त १८ प्रकारचे सर्वाधिक ऑक्सिजन देणारे रोपटे लावण्यात आले आहे. आता सीएसएमटी रेल्वे स्थानकात सुद्धा औषध वनस्पतीचे 70 प्रकारचे वृक्ष लावण्यात येत आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

महत्त्वाची बातमी : मुख्यमंत्र्यांनी दिली आठ दिवसांची मुदत! मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा

mumbai news central railways to build herbal garden in heritage lane of CSMT Station


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news central railways to build herbal garden in heritage lane of CSMT Station