शिळफाटा रस्त्यावरील पत्रीपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; कल्याण डोंबिवलीकरांना अखेर दिलासा

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 25 January 2021

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भिवंडी कल्याण शिळफाटा रस्त्यावरील पत्रीपुलाचे (आई तिसाई देवी उड्डाणपूल) लोकार्पण करण्यात आले

मुंबई -  आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भिवंडी कल्याण शिळफाटा रस्त्यावरील पत्रीपुलाचे (आई तिसाई देवी उड्डाणपूल) लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे उद्घाटन करण्यात आले, 104 वर्षांपुर्वीचा उड्डाणपूल नव्याने उभा करण्यात आला.

...असा झाला प्रवास 
- भिवंडी-कल्याण-शिळफाटा मार्गावरील 104 वर्षे जुना पत्रीपूल जुलै 2018 मध्ये धोकादायक जाहीर करण्यात आला. त्यानंतर 22 ऑगस्ट 2018 ला पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. यानंतर 24 सप्टेंबरला तो तोडण्याचा प्रयत्न झाला; मात्र तांत्रिक अडचण आल्याने काम थांबले. मध्य रेल्वेने मेगाब्लॉक जाहीर करताच 18 नोव्हेंबर 2018 ला हा पूल जमीनदोस्त करण्यात आला. 
- 30 डिसेंबर 2018 ला नवीन पत्रीपुलाचे भूमिपूजन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. भूमिपूजनानंतर आठ महिन्यांच्या कालावधीत पुलाचे बांधकाम पूर्ण केल्यास संबंधित ठेकेदाराचा सत्कार करण्याची घोषणा त्या वेळी शिंदे यांनी केली; मात्र आठ महिन्यांत हा पूल काही पूर्ण झाला नाही. विविध तांत्रिक अडचणींशिवाय कोरोना लॉकडाऊनमुळे पुलाचे काम लांबले. 
- सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक अक्षरशः त्रासले होते. त्यामुळे 2020 च्या अखेरपासून या पुलाच्या कामाला वेग देण्यात आला. दोन दिवसांपूर्वीच पुलाचे काम पूर्ण झाले असून रंगरंगोटी, संरक्षक जाळ्या, परिसर सुशोभीकरण आदी कामे उरकल्यानंतर हा पूल आता वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. 

 

पत्रीपुलाची रचना 
लांबी- 110 मीटर 
रुंदी 11 मीटर 
खर्च 38 कोटी 

गर्डर साकारताना... 
- पत्रीपुलाचा गर्डर हैदराबाद येथे ग्लोबल स्टिल कंपनीने 250 कारागिरांच्या सहाय्याने बनवला. हा गर्डर बनवण्यासाठी 9 ते 10 महिन्यांचा कालावधी आवश्‍यक होता; परंतु नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि पुलाचे काम वेगात करण्याच्या उद्देशाने हा गर्डर केवळ दोन महिन्यांतच साकारण्यात आला. 
- गर्डर बनवण्यासाठी लागणाऱ्या यंत्रणा ग्लोबल स्टिल कंपनीने जर्मनी आणि इटली येथून आणल्या होत्या. गर्डर पूर्ण होण्यासाठी दिवस-रात्र काम सुरू होते. यादरम्यान, कोरोना लॉकडाऊन आणि पावसाचा अडथळा आला; परंतु त्यावरी मात करत गर्डर पूर्ण केल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रिषी अग्रवाल यांनी सांगितले. 
- 25 किलोमीटर लांबीच्या वेल्डिंग वर्कने हा गर्डर साकारण्यात आला आहे. या गर्डरसाठी 30 हजार नट-बोल्ट, 45 हजार छिद्र (कनेक्‍टिंग होल) करावे लागले. या संपूर्ण पुलाचे वजन साधारण 850 टन इतके आहे

mumbai news CM inaugurates Patripul on Shilphata Road at kalyan dombivali


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news CM inaugurates Patripul on Shilphata Road at kalyan dombivali