तुम्हाला दुसरं लॉकडाऊन हवं आहे का ? अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींनी विचारलाय सवाल

तुम्हाला दुसरं लॉकडाऊन हवं आहे का ? अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींनी विचारलाय सवाल

मुंबई : गेल्या १० दिवसांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. यात प्रामुख्याने अमरावती, नागपूर, सांगली, यवतमाळ, बुलढाणा आणि पुणे अशा  काही १० जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. रुग्णसंख्या जरी वाढलेली दिसत असली तरी मृत्यू संख्या तेवढ्या प्रमाणात वाढलेली नाही. मात्र, काही दिवसात त्यातही भर होईल. रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचा दर ही वाढला आहे. पॉझिटिव्ह दर वाढण्यामागची काही प्रमुख कारणे आहेत. या जिल्ह्यांमध्ये सुपर स्प्रेडर घटना घडल्या आहेत. जसे की लग्न, सोहळे, राजकीय रॅली अशा सर्व कार्यक्रमात लोक मास्क घालत नाहीत, बंधने पाळत नाहीत, सोशल डिस्टस्टिंग ठेवत नाहीत. याचा अर्थ लोक बेफिकीरीने वागत आहेत. त्यामुळे, कोरोना जरी नियंत्रणात आला असला तरी तो संपलेला नाही असे आवाहन राज्य टास्क फोर्स समितीकडून करण्यात आले आहे.  

लसीकरणामुळे लोकांमध्ये खोटा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा लोकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. कोरोना आटोक्यात आहे पण, पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे, जर लोकांनी नियमांचे पालन केले नाही, तर तो पुन्हा आटोक्याबाहेर जाईल आणि पुन्हा कडक नियम लागू करावे लागतील. त्यासाठी, राज्यातील या जिल्ह्यातील पोलिसांनी कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी देताना शासनाने जे नियम घालून दिले आहेत. जसे की, ५० लोकांनाच कार्यक्रमात हजर राहता येईल, किंवा सोशल डिस्टस्टिंग पाळावे लागतील, मास्क घालावे हे नियम लोक पाळत आहेत की नाही, याची पडताळणी केली पाहिजे. जर असे केले नसेल तर तिथेच त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे लोकांमध्ये पुन्हा जनजागृती करुन सॅनिटायझेशन किंवा हात स्वच्छ धुतले पाहिजे याविषयी माहिती दिली पाहिजे. जिथे रुग्णसंख्या जास्त प्रमाणात वाढली आहे तिथे सर्वांचे संपर्क ट्रेस केले पाहिजेत.

मुंबईसह राज्यातील परिस्थिती समाधानकारक नाही -

मुंबईसह राज्यातील परिस्थिती सध्या समाधानकारक नाही. रुग्णसंख्या वाढली असून ७४ पैकी १७ जिल्ह्यांमध्ये विशेष काळजी घेण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अकोला, नागपूर अमरावती, हिंगोली, परभणी या ठिकाणी परिस्थिती चिंताजनक वाढ झाली आहे. मुंबईतील काही तीन ते चार वॉर्ड्समध्ये केसेस जास्त आढळून येत आहेत. पण, मुंबईत जास्त वाढ झालेली दिसत नाही. विदर्भासारख्या ठिकाणी चाचण्यांची क्षमता वाढवण्याची गरज आहे. लग्न समारंभासारख्या कार्यक्रमावर निर्बंध आणणे आवश्यक आहे. जे कार्यक्रम सुपरस्प्रेडर आहेत त्यांना परवानगी नाकारली पाहिजे, असे राज्य कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी सांगितले आहे.

मास्क घातलेच पाहिजे -

मास्क हे लोकांनी घातलेच पाहिजे. कारण, त्याबाबत ढिलाई करुन चालणार नाही. लसीकरण सुरू झाले म्हणजे कोरोना संपला हे वातावरण सध्या निर्माण झाले आहे जे फारच भीतीदायक आहे. आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली. त्यात याबाबतचे महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले. शिवाय, जनतेशी याबाबत थेट संपर्क साधावा अशी विनंती या बैठकीत करण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रात असणारी दरीही आम्ही भरुन काढण्याचा प्रयत्न करत आहोत. वैद्यकीय क्षेत्र ही यावर काम करत आहे. एका तासाचा एक व्हिडीओ टास्क फोर्सतर्फे तयार केला जाणार आहे. त्यातून पेरिफेरल रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शन होईल. शिवाय, जिथे माहिती, मार्गदर्शनाची गरज भासेल तिथे टास्क फोर्स ते करण्यासाठी सज्ज आहे, असे ही डॉ. ओक यांनी सांगितले.

लॉकडाऊनची गरज नाही -

दुसरी लाट, दुसरा जिनोमिक किंवा दुसरा लॉकडाऊन असाही काही विचार सध्या राज्याने केलेला नाही. मात्र, ज्या ठिकाणी जास्त केसेस येत आहेत त्या ठिकाणी जर लोक गांभीर्याने वागले नाहीत तर निश्चितच निर्बंध लादावे लागतील. नाहीतर आतापर्यंत जी घेतलेली काळजी हलगर्जीपणामुळे पाण्यात जाईल. मास्क, सोशल डिस्टस्टिंग, सॅनिटायझेशन आणि एका ठिकाणी जास्त लोकांनी न जमणं या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मास्कला दुसरा कोणताच पर्याय नाही असे ही डॉ. ओक यांनी सांगितले. जास्त मृत्यू नाहीत, जास्त रुग्णसंख्याही नाही पण, आता वाढलेली रुग्णसंख्या नजरेआड करुन चालणार नाही त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. आणि त्याच दृष्टीकोनातून आपण पाऊले टाकत आहोत असे डॉ. ओक यांनी स्पष्ट केले आहे.

संपर्क ट्रेस करणे आवश्यक -

एखाद्या लग्नसमारंभात जर एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह असेल तर त्याच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली पाहिजे. त्यातील एखाद्याला जर लक्षणे दिसत असतील तर ताबडतोब तपासणी करुन उपचार सुरू केले पाहिजे. स्पेशल मॉनिटरींग करुन त्यांना आयसोलेशन किंवा संस्थात्मक क्वारंटाईन केले पाहिजे. होम क्वारंटाईन किंवा होम आयसोलेशन आपल्याकडे जास्त गंभीरतेने घेतले जात नाही. त्यामुळे संस्थात्मक क्वारंटाईन हा पर्याय राबवला पाहिजे. मुंबईतील एम पश्चिम म्हणजे चेंबूरलगतच्या परिसरात रुग्णसंख्या वाढली आहे. इथले परिसर प्रतिबंध केले पाहिजे. त्यांना कठोर नियम लावले पाहिजेत असे राज्य कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले आहे.

लॉकडाऊनची एवढ्यात गरज नाही -

मुंबईची परिस्थिती अजूनही नियंत्रणात आहे, त्यामुळे लॉकडाऊनची एवढ्यात तरी गरज नसुन लोकांनी जर कोरोना प्रतिबंधासाठी असणारे नियम काळजीपूर्वक पाळले पाहिजेत. राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढते आहे तिथे जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे असून सरसकट सगळीकडे लॉकडाऊनची गरज नसल्याचे ही डॉ. सुपे यांनी सांगितले. मुंबईतील एम पश्चिम भागात वाढलेली रुग्णसंख्या झोपडपट्टीतील नसून उंच इमारतीतील रुग्णसंख्या आहे.

राज्याचा आलेख चढता -

सध्या राज्याची परिस्थिती पाहिली तर बऱ्याच ठिकाणी आलेख हा चढताच पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी सरळ आलेख पाहायला मिळत आहे. त्यामुळे, राज्यातील काही ठिकाणं सोडल्यास इतर ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आहे. पण, लोकांनी काळजी घेतली नाहीतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जायला वेळ लागणार नाही असेही डॉ. सुपे यांनी सांगितले.

mumbai news do you want second big lockdown taskforce asked question to citizens of maharashtra

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com