मुजोर रिक्षाचालकांविरोधात डोंबिवलीकरांचे 'प्रोटेक्ट अगेन्स्ट रिक्षावाला“

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

जास्त गर्दीच्या रस्त्यावर परिवहनच्या बसेस सकाळी व संध्याकाळी सुरू झाल्यास रिक्षा चालक वठणीवर येतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावर सभापती संजय पावशे म्हणाले, "मागणीनुसार बससेवा देता येईल, परंतु प्रवाशी समोर बस असली तरी रिक्षामागे धावतात, यामुळे डोंबिवलीतील अनेक मार्ग नाइलाजाने बंद करावे लागले. प्रवाशांनीच रिक्षा प्रवास टाळून आग्रही मागणी केल्यास पूर्वीचे व नवीन मार्ग सुरू करता येतील."

डोंबिवली - मुजोर रिक्षाचालकांविरोधात संघटित होऊन आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढा देण्यासाठी डोंबिवलीकर रिक्षा प्रवाशांनी निर्धार केलाय. प्रवाशांना वेठीस धरून काही रिक्षाचालक मनमानी करत असल्याने वैतागलेल्या डोंबिवलीकरांनी अखेर एकत्र येऊन 'प्रोटेक्ट अगेन्स्ट रिक्षावाला“ असा ग्रूप तयार केला आहे. रविवारी सायंकाळी ठाकूर सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत रिक्षाचालकांच्या विरोधात पुढील भूमिकेबाबत चर्चा झाली. यासभेत परिवहन समिती सभापती संजय पावशे आणि मनसे उपाध्यक्ष राजेश कदम यांसह विरोधी पक्षनेते मंदार हळबे व अनेक मान्यवर उपस्थित होते.

डोंबिवलीत रिक्षा चालकांच्या मनमानी विरुद्ध एकट्या प्रवाशांना पोलीसही मदत करीत नाहीत.त्यामुळे नागरिकांनी व प्रवाशांनी संघटित होऊन लढा देण्याचा निर्णय घेतला असून विविध मागण्यांचे निवेदन वाहतूक पोलिसांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रूपमार्फत 'रिक्षा चालकांविरुद्ध प्रवासी' असा ग्रूप स्थापन करणाऱ्या वंदना सोनवणे यांनी विविध प्रकारे महिला व वृद्ध नागरिकांना होणाऱ्या त्रासाविरुद्ध आवाज उठवण्याची गरज व्यक्त केली. रिक्षाचालकाविरुद्ध जर तक्रार करण्यासाठी प्रभागात अधिकाऱ्याचे मोबाईल नंबर लावण्याची मागणी करण्यात आली. तसेच जे मान्यताप्राप्त रिक्षा स्टँड आहेत. तेथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची आग्रहाची मागणी करण्यात आली. जवळचे भाडे नाकारणे, बेकाकदेशीर प्रवासी घेणे आदी प्रश्न मांडण्यात आले. राजकीय मतभेद बाजूला ठेवून नागरिक एकत्र आले होते. सध्या जी व्यवस्था आहे ती खराब असून ठोस भूमिका घेऊन सर्व सामान्य नागरिकांना एकत्र होण्याचे आवाहन करण्यात आले. आजच्या सभेला अपेक्षेपेक्षा प्रतिसाद कमी होता.

परिवहन समितीचे सभापती संजय पावशे सभेला हजर होते. केवळ व्हॉट्सअॅपवर चर्चा करून काही होणार नाही. नागरिकांच्या सह्याचे निवेदन देण्यात येईल असे सचिन गवई यांनी सांगितले. या प्रसंगी एक फॉर्म देण्यात आला तो भरून एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले. मनसे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी यावेळी सभेत महापौर राजेंद्र देवळेकर आणि सर्व रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांना बोलावले असते तर त्यांना याची माहिती मिळाली असती असे सांगितले. तर निखिल माने यांनी मुजोर रिक्षाचालकांविरोधात आक्रमक भूमिका घेतली पाहिजे असे यावेळी सांगितले.

इंदिरा चौकाचे नाव रिक्षा चौक करा...
चारी दिशांनी रस्ताभर बेशिस्तपणे रिक्षा असणाऱ्या डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकाचे नाव रिक्षा चौक करू या. कारण या चौकात रिक्षा थांबे खूप झाले आहेत व वाहतूक पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात यामुळे नागरिकांची गैरसोय होत असते. यापुढे वाहतूक नियंत्रण शाखेत पुढील चर्चा करावी  अशी उपरोधिक प्रतिक्रिया एका डोंबिवलीकराने व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news dombivli portect against rickshaw drivers