चेंगराचेंगरीच्या आठवणींनी भरते धडकी!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 October 2017

मुंबई - एल्फिन्स्टनच्या पुलावर हळूहळू गर्दी वाढत होती... काही वेळातच धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरी सुरू झाली... जीव वाचवण्यासाठी काहींचा आक्रोश सुरू होता; तर काहींचा आवाज कायमचा बंद झाला होता. थरकाप उडवणाऱ्या या दुर्घटेनेतील कटू आठवणींनी जखमींना आजही धडकी भरते. यातील काही रुग्णांना मानसिक धक्काच बसला आहे. हा धक्का त्यांना मोठ्या आजारात ढकलणारा ठरू नये, यासाठी केईएम रुग्णालयाच्या मानसोपचारतज्ज्ञ विभागातील डॉक्‍टर काळजी घेत आहे. जखमींपैकी सहा रुग्णांना मानसोपचार तज्ज्ञांची सर्वाधिक गरज आहे, अशी माहिती या विभागाच्या प्रमुख डॉ. शुभांगी पारकर यांनी दिली.

दुर्घटनेतून जगल्याचा आनंद जखमींना आहे. वेळेत मदत मिळाली चांगले उपचार मिळाले म्हणून ते खूश आहेत. मात्र, त्यावेळच्या आठवणींनी मानसिक त्रास होत असल्याचे अनेकांनी डॉक्‍टरांना सांगितले. डॉ. शुभांगी पारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या आठवणी सांगून मन मोकळे करणे ही प्राथमिकता लक्षात घेऊन विभागातील डॉक्‍टर संबंधित रुग्णांशी वैयक्तिक संपर्कात आहेत.

जखमींपैकी काहीजण रुग्णालयात आले त्या वेळी ते बेशुद्धावस्थेत होते. त्यांना नेमके काय घडले ते त्या वेळी माहीत नव्हते. दुर्घटनेवेळी शुद्धीत असणाऱ्यांपैकी काही जखमी भूक लागत नसल्याची आणि झोप येत नसल्याची तक्रार डॉक्‍टरांकडे केली. जखमींपैकी 6 जणांच्या मानसिकतेवर दुर्घटनेचा अधिक परिणाम झाला आहे. अशा रुग्णांशी डॉक्‍टर सातत्याने संवाद करीत आहेत. आणखी काही दिवसांनी अशा रुग्णांवर मानसिक उपचारांची गरज असल्याचे डॉक्‍टरांच्या लक्षात आले. त्यानुसार संबंधित रुग्णांवर मानसोपचार केली जातील, असे डॉ. पारकर यांनी सांगितले.

डॉक्‍टरांकडे अनेक जखमींनी त्यांचे दुर्घटनेतील अनुभव आणि होत असलेला मानसिक त्रास व्यक्त केला आहे. त्या वेळी संबंधितांच्या कुटुंबियांना जखमींना आधार देण्याचा सल्ला देण्यात आला होता. मुंबईकरांनी दुर्घटनेवेळी दाखवलेले मदतीचे स्पीरीट जखमींच्या कुटुंबांतही दिसून आले.
- डॉ. शुभांगी पारकर, मानसोपचार विभाग प्रमुख, केईएम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news elphinstone station stampede many dead injured