वडिलांनी बाळाला वाचविले मृत्यूच्या दाढेतून!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

'सीपीआर' देत अडीच वर्षांच्या चिमुकल्याला खासगी गाडीतून नेले रुग्णालयात

'सीपीआर' देत अडीच वर्षांच्या चिमुकल्याला खासगी गाडीतून नेले रुग्णालयात
मुंबई - ऍम्ब्युलन्सला खर्च करायला पैसे नाहीत. खासगी गाडीतून "सीपीआर' देत वडिलांनी मुंबईच्या वाडिया रुग्णालयात आणले, अशी कहाणी आहे प्रियोम चौधरी या अडीच वर्षांच्या बाळाची. वडिलांनी दिलेल्या "सीपीआर'मुळेच मुलाचे प्राण वाचवणे शक्‍य झाल्याचे शस्त्रक्रिया करणारे डॉक्‍टर बिस्वा पांडा यांनी सांगितले.

दीड महिन्याच्या बाळावर 15 दिवस तापासाठी उपचार सुरू होते. बाळाच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने मिरा रोड येथील सक्‍सेना रुग्णालयाने बाळाला उपचार देण्यास नकार दिला. त्यानंतर बाळाचे वडील गुड्डू चौधरी यांनी अनेक हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. त्यानंतर उमराव हॉस्पिटलच्या डॉक्‍टरांनी बाळाची प्रकृती नाजूक असल्याने त्याला मुंबईच्या वाडिया किंवा केईएम रुग्णालयात नेण्यास सुचवले. तीन जूनच्या रात्री बाळाची प्रकृती अचानक बिघडली तेव्हा रुग्णवाहिकेसाठी पैसे नसल्याने गुड्डू यांनी खासगी वाहनातून मुलाला वाडिया रुग्णालयात आणले. रस्त्यात बाळाला श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे गुड्डू यांच्या लक्षात आले. तेव्हा गुड्डू यांनी बाळाला सीपीआर दिला. 10-15 मिनिटांच्या अंतराने तोंडाने श्वास दिला. पत्नीला बाळाच्या हाता पायाला चोळायला सांगितले.

त्या रात्री बाळाला वाडिया रुग्णालयात आणल्यावर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्याबरोबरच त्याच्या तपासण्या आणि चाचण्या सुरू झाल्या. या वेळी बाळाच्या हृदयात 2.3 से.मी. बाय 2.3 से.मी. बाय 2.3 से.मी. आकाराचा ट्युमर बाळाच्या हृदयातून काढला.

बाळावर शस्त्राक्रिया करणारे डॉ. बिस्वा पांडा यांच्या म्हणण्यानुसार बाळाला सीपीआर दिल्यामुळे बाळाची प्रकृती चांगली राहिली आणि म्हणून शस्त्रक्रिया यशस्वी झाली. तब्बल सहा तास ही शस्त्रक्रिया झाली; पण 15 दिवस बाळाला झालेल्या तापाने बाळाच्या यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसांवर परिणाम झाला होता. त्यामुळे रिकव्हरीसाठी बाळाने 10-12 दिवसांचा अवधी घेतला. डॉ. चुंडाल विल्सन यांच्या म्हणण्यानुसार असा दोष मोठ्या माणसांमध्ये प्रामुख्याने आढळतो. लहान मुलांमध्ये असा दोष आढळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. केवळ एक टक्के मुलांमध्ये असा दोष आढळतो.

'सीपीआर' म्हणजे काय?
तोंडाने श्‍वसन देण्याच्या ("माउथ टू माउथ') प्रक्रियेला वैद्यकीय परिभाषेत "सीपीआर' (कार्डिओ पलमोनेरी रिससिटेशन) म्हटले जाते. अकस्मात हृदयगती थांबल्यास त्या व्यक्तीला जिवंत ठेवण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते.

बाळाच्या अनोख्या कहाणीचा व्हिडिओ पाहा -
https://www.facebook.com/SakalNews/videos/10154924779806973/


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news father saves his child to cpr