गुलाबी थंडीच्या फेब्रुवारीत मुंबई तापली; 22 वर्षात तिसऱ्यांदा 36 अंशांपेक्षा जास्त तापमान

भाग्यश्री भुवड
Monday, 22 February 2021

गुलाबी थंडीचा आनंद घेणाऱ्या मुंबईकरांना रविवारी कडक उन्हाला सामोरे जावे लागले.

मुंबई, 22 : फेब्रुवारी महिना हा गुलाबी थंडीचा महिना मानला जातो. परंतु, रविवारी मुंबई तापलेली अनुभवायला मिळाली. प्रादेशिक हवामान खात्याच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास गेल्या 22 वर्षांत मुंबईतील कमाल तपमान 36 डिग्री अंश सेल्सिअसपर्यंत पोहचण्याची ही तिसरी वेळ आहे. 

गुलाबी थंडीचा आनंद घेणाऱ्या मुंबईकरांना रविवारी कडक उन्हाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे, गेल्या 22 वर्षांत 28 फेब्रुवारी 1999 रोजी आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान 38.5 डिग्री सेल्सियस नोंदले गेले होते, त्यानंतर 18 फेब्रुवारी 2017 रोजी 38.4 डिग्री सेल्सियस तापमान नोंदले गेले होते.

महत्त्वाची बातमी : भीमा कोरेगाव केस : वर्वरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीनाचा दिलासा

प्रादेशिक हवामान खात्याकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, रविवारी मुंबई उपनगरातील कमाल तापमान 36.3 डिग्री सेल्सियस तर मुंबई शहराचे तापमान 34.6 डिग्री सेल्सियस नोंदवण्यात आले.
गेल्या दोन दशकांत तिसऱ्यांदा फेब्रुवारी महिन्यात मुंबईत इतके कडक ऊन अनुभवण्यास मिळाले. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, रविवारी उपनगराचे कमाल तपमान सामान्यपेक्षा 5 डिग्री सेल्सियस व शहरापेक्षा 4.4 डिग्री सेल्सियस जास्त नोंदवले गेले. 

मुंबईचे किमान तापमानही वाढले आहे. रविवारी शहराचे किमान तापमान 23 अंश व उपनगरात 21 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. येथेही शहराचे किमान तापमान 2.5 डिग्री सेल्सियस तर उपनगरात 2.3 डिग्री सेल्सियस जास्त नोंदले गेले. 

प्रादेशिक हवामान खात्याचे शास्त्रज्ञ शुभांगी गुटे यांनी सांगितले की, पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणार्या वार्याचा प्रवाह अधिक मजबूत झाला आहे. हे गरम वारे समुद्रातून मुंबईकडे येणारे थंड वारे वाहू देत नाहीत. 

महत्त्वाची बातमी : घर विकून दिवसरात्र चालवताय रिक्षा; नातीच्या शिक्षणासाठी आजोबांचे कष्ट पाहून नेटकरी भावूक 

जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा मुंबईचे तापमान जास्त वाढते. हवामानाचा अंदाज सांगणारी खासगी संस्था स्कायमेटचे मुख्य मेट्रोलॉजिस्ट महेश पालावत यांनी सांगितले की, जेव्हा उष्ण वारे पूर्वेतून वेगाने वाहतात तेव्हा मुंबईचे तापमान वाढते. फेब्रुवारी अखेर पर्यंत मुंबईचे कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअस राहील. तर किमान तापमानही 20 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असेल.

mumbai news heat wave in mumbai temperature crossed 36 degrees for the third time in last 22 years


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news heat wave in mumbai temperature crossed 36 degrees for the third time in last 22 years