भूमाफियांमुळे नेवाळी आंदोलनाला हिंसक वळण- आमदार गायकवाड

संजीत वायंगणकर
सोमवार, 10 जुलै 2017

मोठ्या प्रमाणावर नौदलाच्या जागा भूमाफियांकडून गिळंकृत होत असल्याने आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याला दुजोरा मिळत आहे.

डोंबिवली : अनिर्बंध भूमाफियांमुळे नेवाळी आंदोलनाला हिंसक वळण लागले व त्यात स्थानिक भूमीपुत्र पोलिसांच्या रागास बळी पडले, असा आरोप कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी केला.

कल्याण डोंबिवली पत्रकार संघातर्फे आयोजित दिलखुलास कार्यक्रमात नेवाळी संदर्भात बोलताना ते म्हणाले 2003 मध्ये हा प्रश्न सुटणार होता परंतू बिल्डर धार्जिण्या 27 गाव संघर्ष समितीच्या राजकारणामुळे नेवाळी जागेचा तिढा वाढत गेला. ही गावे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यावर “ई” प्रभागात येणाऱ्या नेवाळी परिसरातील जमीनींवर भूमाफियांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरुन मोठ्या प्रमाणावर अनधिकृत चाळी व दुकान गाळे बांधण्यास सुरवात केली आहे.

प्रत्येक खोलीमागे भुमाफियांकडून पालिका अधिकाऱ्यांना ठराविक रक्कम पोचते अशी माहिती वसार गावातील एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांने नाव न सांगण्याच्या अटिवर दिली.तसेच नौदलाच्या ताब्यातील जमिनींच्या सातबारा मध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याची माहिती ही त्यांनी दिली. मोठ्या प्रमाणावर नौदलाच्या जागा भूमाफियांकडून गिळंकृत होत असल्याने आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याला दुजोरा मिळत आहे. स्वस्तात मिळणाऱ्या अनधिकृत जागांमुळे यापरिसरात आधिकृत विकासक येण्यास कचरतात .हिंसक आंदोलनानंतरचे तणावपूर्ण वातावरण आता निवळत असून पुन्हा भुमाफिया सक्रिय झाल्याचे चित्र आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news newali airport protests land mafia mla ganpat gaikwad