लसीवर विश्वास नाही आणि अ‍ॅपमधील बिघाड कायम; तीन दिवसांत फक्त 13 टक्के कर्मचाऱ्यांनी घेतला दुसरा डोस

 भाग्यश्री भुवड
Thursday, 18 February 2021

कोविन अ‍ॅपमध्ये बिघाड सुरू असल्याने अनेक लाभार्थ्यांना संदेश येत नाही. तर पोर्टलवर अनेकांची नावे दिसत नाहीत

मुंबई, 18 : मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाची नवीन प्रकरणे वाढत आहेत. पालिका प्रशासन यासाठी आधीपासूनच हाय अलर्टवर आहे. हा रोग टाळण्याचा उपाय म्हणजे लस, परंतु आरोग्य कर्मचारी त्यांचा नियमित डोस घेण्यासाठी पोहचत नाहीत. आत्तापर्यंत 100% लाभार्थी पालिकेने केलेल्या यादीनुसार लसीकरण केंद्रांवर कधीच पोहोचलेले नाहीत. इतकेच नव्हे तर ज्यांनी पहिला लसीचा डोस घेतला आहे त्यांच्यापैकी बरेचजण दुसरा डोस घेण्यास पुढे येत नाहीत. गेल्या तीन दिवसांत फक्त 13 टक्के लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. 

मुंबईत लाभार्थ्यांना लसींचे दोन डोस दिले जातात.त्यातील एक कोव्हिशिल्ड आणि दुसरी कोवॅक्सीन लास आहे. अशात लाभार्थ्यांना कोणत्याही एका लसीचे दोन डोस घ्यावे लागतात. पहिला डोस 16 जानेवारी रोजी देण्यात आला आणि त्यानंतर 28 दिवसांनी लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस घ्यावा लागेल. मुंबईत पहिल्या तीन दिवसांत 5,251 आरोग्य कर्मचार्‍यांनी लसीकरण केले आणि 28 दिवस पूर्ण करूनही लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी केवळ  676 आरोग्य कर्मचारी दाखल झाले. ज्यातुन लसीकरणाबाबत आरोग्य कर्मचार्‍यांचा असलेला संकोच स्पष्टपणे दिसून येतो.

महत्त्वाची बातमी लोकलमध्ये चिवडा, उपमा, पाणीपुरी पार्ट्या; कोरोना नियमांना प्रवाशांनी बसवलं धाब्यावर

पालिकेने नुकतीच लसीकरणासाठी आरोग्य कर्मचार्यांना कसे प्रेरित करावे या विषयी एक बैठक घेतली. त्यात पालिका रुग्णालयांपासून खाजगी रुग्णालयांपर्यंत काम करणाऱ्या आरोग्य सेवा कर्मचार्‍यांना लस घेण्यास प्रवृत्त करण्यास सांगण्यात आले. त्यांचे प्रश्न आणि गोंधळ दूर करा अशा सूचनाही देण्यात आल्या. 

कोविन अ‍ॅपमध्ये बिघाड सुरुच - 

कोविन अ‍ॅपमध्ये बिघाड सुरू असल्याने अनेक लाभार्थ्यांना संदेश येत नाही. तर पोर्टलवर अनेकांची नावे दिसत नाहीत आणि पोर्टलमध्ये नाव असल्याशिवाय लाभार्थ्यांना लस दिली जात नाही. 

लसीबद्दल अजूनही शंका - 

पालिका आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, लसीचा परिणाम आणि दुष्परिणामांबद्दल अजूनही आरोग्य कर्मचार्‍यांमध्ये शंका आहे. पहिला डोस घेतल्यानंतर काहींनी दुसरा डोस घेण्यास संकोच व्यक्त केला आहे. तर काहीजण असा विचार करत आहेत की ते 28 दिवसांनंतर कधीही डोस घेतला तरी चालेल. 

SPECIAL REPORT : 'अग्निपरीक्षे'त 36 रुग्णालये नापास; मुंबईत अनधिकृत रुग्णालयांचा सुळसुळाट

दुसरा पर्याय नाही - 

कोरोना केसेस वाढण्याच्या बाबतीत आमच्याकडे लस घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. लसीचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. मी स्वतः लस घेतली आहे आणि प्रत्येकाने ती घेतली पाहिजे. आम्ही सर्व रुग्णालयांना त्यांच्या कर्मचार्‍यांना समजावून सांगण्यास आणि लस देण्यास सांगितले आहे असं मुंबई महापालिका आरोग्य विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे.

mumbai news only 13 percent helath workers took second dose of corona vaccine

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news only 13 percent helath workers took second dose of corona vaccine