लोकलमध्ये चिवडा, उपमा, पाणीपुरी पार्ट्या; कोरोना नियमांना प्रवाशांनी बसवलं धाब्यावर

कुलदीप घायवट
Thursday, 18 February 2021

प्रवाशांनी लोकलमध्ये चिवडा, उपमा पार्टी, पाणीपुरी पार्टी किंवा काही खाऊचे पदार्थ खाणे चुकीचे आहे.

मुंबई, ता. 18 : उपनगरीय लोकल मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. दिवसभरातील 1 ते 4 तास मुंबईकर लोकल प्रवासात घालवितात. सर्व सण उत्सव लोकलमध्ये साजरे केले जातात. पण, आता कोरोनाचे संकट पुन्हा डोकं वर काढताय की काय असा प्रश्न पडलाय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला दुजोरा देणे आवश्यक असताना, प्रवासी लोकलमध्ये चिवडा, उपमा, पाणीपुरी पार्टी करताना दिसून येत आहेत.

'मी, माझी लोकल आणि आम्ही प्रवासी गट पार्टी करतोय', असे चित्र लोकल प्रवासात दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू झालेली लोकल सेवा बंद होण्याचे कारण ठरू नका, असे आवाहन प्रवासी संघटनेकडून करण्यात आले आहे.

मुंबई महानगरात कोरोना रुग्ण वाढण्याचे प्रमाण जास्त झाले आहे. 1 फेब्रुवारीपासून लोकल सुरू झाली, त्यानंतर सकारात्मक कोरोना रुग्ण सापडण्याची टक्केवारी वाढली आहे. काही प्रवासी सोडल्यास लोकल प्रवासात प्रवासी विना मास्क फिरत आहेत. तर, काही प्रवासी कोरोना नियमांना धाब्यावर बसवून प्रवास करत आहेत. कोरोना नियमांचे पालन करणे दुरचेच झाले. परंतु, प्रवासी लोकलमध्ये चिवडा, पाणी पुरी पार्टी करत असल्याचे दिसून येत आहेत. 

महत्त्वाची बायामी : आता थेट दाखल होणार FIR; पुन्हा डोकं वर काढणारा कोरोना आणि नियंत्रणासाठीचा मेगाप्लान वाचा

प्रवासी गट कागदी प्लेटमध्ये पोह्यांचा चिवडा, साबुदाणा चिवडा, उपमा घेऊन प्रवासी गटातील सर्व प्रवाशांना वाटप करत आहेत. तर, काही प्रवासी गट लोकलमध्ये तिखट-गोड चटणीचे डबे घेऊन येतात. पुरी कागदी प्लेटमध्ये ठेवून पुरीत तिखट-गोड चटणी आणि चाट पाणी टाकून लोकलमध्ये पाणीपुरीची पार्टी करत आहेत. 

त्यामुळे प्रवासी गट कोरोना नियमांना धाब्यावर बसवून निष्काळजीपणे वागत आहेत. अशा प्रवाशांवर तत्काळ दंडक कारवाई होणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया प्रवासी संघटनेकडून देण्यात आली. 

प्रवाशांनी लोकलमध्ये चिवडा, उपमा पार्टी, पाणीपुरी पार्टी किंवा काही खाऊचे पदार्थ खाणे चुकीचे आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा दिली. त्यानंतर कोरोना  रुग्ण वाढण्याचे प्रमाण जास्त झाले. लोकल सेवा सुरू झाल्याने रोजंदारी वर्ग, नोकरदार वर्ग, श्रमिक यांचा प्रवासातील वेळ, पैशांची बचत होत आहे. त्यामुळे पुन्हा लोकल प्रवास बंद होण्याचे प्रवाशांनी कारण ठरू नये. यंत्रणेनेकडून कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. विना मास्क दिसणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली पाहिजे, असं मध्य रेल्वेच्या  विभागीय सल्लागार समिती सदस्या अनिता झोपे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरू करण्यासाठी राज्य सरकारला, रेल्वे प्रशासनाला निवेदन दिली. राज्य सरकारने कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना लोकल सेवा सुरू केली. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला. मात्र प्रवासी चिवडा पार्टी, पाणी पुरी पार्टी करत असतील, तर सर्व मेहनतीवर पाणी फिरेल. कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे यंत्रणेने डोळ्यात तेल घालून कारवाई केली पाहिजे. नाहीतर, येणारा काळ वाईट असू शकतो असं उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ अध्यक्ष नंदकुमार देशमुख म्हणालेत. 

mumbai news amid corona people are celebrating and partying in mumbai local train


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news amid corona people are celebrating and partying in mumbai local train