आंबिवली स्थानकातील पादचारी पुल फास्ट ट्रॅकवर

श्रीकांत सावंत
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

टिटवाळा स्थानकातील पादचारी पुलास झळाळी...
आंबिवली स्थानकातील जुन्या पुलाचे डागडुजी पुर्ण झाल्यानंतर टिटवाळा स्थानकातील पादचारी पुलाचीही दुरूस्ती करण्यात येणार आहे. त्याचे खांब, स्लॅप, छत, पायऱ्यांचे मजबुती करण करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

ठाणे - मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानकांपैकी एल्फिन्स्टन, करीरोड आणि आंबिवली स्थानकात बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या नियोजनासाठी लष्कराच्या अधिकाऱ्यांकडून तयारी सुरू झाली असून आंबिवली स्थानकातील पुलाच्या निर्माणासाठी नुकतीच पाहणी पुर्ण झाली आहे. या पाहणीनंतर आंबिवली स्थानकामध्ये कल्याण दिशेला असलेला जुना पुल हटवण्याऐवजी कसारा दिशेला नवा पुल उभारण्याचा निर्णय लष्करी अधिकाऱ्यांनी घेतला आहे. तर नवा पुल पुर्ण झाल्यानंतर जुना कल्याण दिशेचा पुल तोडून रेल्वेकडून त्या पुलाची बांधकाम करण्याचे ठरवण्यात आले आहे. पुढील पंधरा दिवसांमध्ये लष्कराकडून या कामाची सुरूवात करण्यात येणार असली तरी त्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून आंबिवली स्थानकात सध्या अस्तित्वात असलेल्या जुन्या पुलाचे पंधरा दिवसांमध्ये मजबुतीकरण करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाकडून देण्यात आली आहे.   

कल्याण-कसारा दरम्यान असलेल्या आंबिवली स्थानकातील पादचारी पुलाची अवस्था अत्यंत जिर्ण झाली असून तेथे तात्काळ पुल उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर या पुलाच्या उभारणीची जबाबदारी लष्कराकडे देण्यात आली. लष्करी अधिकाऱ्यांनी गेले आठवडाभरामध्ये या स्थानकाचा अभ्यास केल्यानंतर जुना पुल तोडून त्याच जागी नवा पुल बांधण्याची प्रक्रीया अधिक किचकट होण्याची शक्यता असल्याचे लक्षात आले. त्यामुळे अधिकाऱ्यांना सध्या अस्तित्वात असलेला जिर्ण पुल तसाच ठेवून कसारा दिशेला नवा पुल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. नवा पुल बांधण्याचे काम सुरू झाल्यानंतर या भागात कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्यामुळे जुना पुलाची डागडुजी करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाने त्याला होकार दिला असून पुढील पंधरा दिवसांमध्ये ही डागडुजी होणार आहे. मंगळवारी आंबिवली स्थानकामध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन या कामाचा पुर्व आढावा घेतला. बुधवारपासून युध्दपातळीवर हे काम सुरू होणार आहे. 

मध्य रेल्वेचे वरिष्ठ मंडळ अभियंता मुंबई तरूण दंडोकिया, सहाय्यक अभियंता व्ही. एस. सतिषन, सिनिअर सेक्शन इंजिनिअर आर. के. श्रीवास्तव आणि आरपीएफचे अधिकारी आरविंद कुमार यांनी मंगळवारी या भागामध्ये येऊन कामे पुर्ण करण्यासाठी रेल्वेच्या ठेकेदाराला सुचना देण्यात आल्या. यावेळी कल्याण-कसारा-कर्जत प्रवासी संघटनेचे राजेश घनघाव उपस्थित होते. या भागातील जुन्या पुलाच्या दुरूस्ती दरम्यान प्रवाशांना रेल्वे रुळ ओलांडावे लागणार असल्यामुळे तेथे सुरक्षा रक्षकांची नेमणुक करून प्रवाशांना मदत करण्याचे तसेच काम सुरू असल्याची माहिती तात्काळ या भागात लावण्याची सुचना घनघाव यांनी केली आहे. संघटनेच्या प्रयत्नामुळे हे काम मार्गी लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट करून 8 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान हे काम पुर्ण करण्याची सुचना लष्कराकडून रेल्वे प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

टिटवाळा स्थानकातील पादचारी पुलास झळाळी...
आंबिवली स्थानकातील जुन्या पुलाचे डागडुजी पुर्ण झाल्यानंतर टिटवाळा स्थानकातील पादचारी पुलाचीही दुरूस्ती करण्यात येणार आहे. त्याचे खांब, स्लॅप, छत, पायऱ्यांचे मजबुती करण करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

Web Title: mumbai news: railways bridge