esakal | Talai Village: तळई गावातील घरांची उभारणी दिवाळीपूर्वी अशक्य
sakal

बोलून बातमी शोधा

Talai Village

तळई गावातील घरांची उभारणी दिवाळीपूर्वी अशक्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : तळई गावातील 63 कुटुंबियांसाठी घराची उभारणी येत्या दिवाळीपर्यंत करण्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. मात्र घर उभारणीसाठी आवश्यक जमीन हस्तांतरण आणि भूसंपादन प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अद्याप पूर्ण झालेली नाही. घर उभारणीचा आराखडा तयार केल्यानंतर घरे उभारणीसाठी निविदा मागविण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया दिवाळीपूर्वी पूर्ण होणार नसल्याने कुटुंबियांना दिवाळीपूर्वी घरे मिळणे अवघड झाले आहे.

अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत रायगड जिल्ह्यातील तळई गाव व आजूबाजूच्या वाड्यांमधील घरे उद्ध्वस्त होऊन मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली. तळई गावातील व आजूबाजूच्या पाड्यातील 261 घरांची उभारणी करून नागरिकांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणावर (म्हाडा) सोपविली आहे. त्या दृष्टीने म्हाडातर्फे नियोजन करण्यात येत असून पुनर्वसन घरांची प्रतिकृती म्हाडामार्फत वांद्रे येथील मुख्यालयाच्या प्रांगणात तयार करण्यात आली आहे. सदनिकांच्या प्रतिकृतीची पाहणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 24 ऑगस्ट रोजी केली. यावेळी आव्हाड यांनी दरडग्रस्त गाव आणि वाड्यांचे पुनर्वसन प्रकल्प दोन टप्प्यांत करण्याची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात तळई गावातील 63 कुटुंबासाठी घरांची उभारणी येत्या दिवाळी पर्यंत केली जाईल, असे जाहीर केले. तर दुसऱ्या टप्प्यात मार्च 2022 पर्यंत आजूबाजूच्या पाड्यातील कुटुंबियांसाठी घरांची उभारणी केली जाणार आहे.

हेही वाचा: मुंबईत दैनंदिन रुग्णांचा आकडा पाचशेच्या वर

तळई गावातील कुटुंबियांसाठी घरे उभारण्यासाठी गावातील नागरिकांनी जमीन देऊ केली आहे. या जमिनीचे हस्तांतरण व भूसंपादन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अद्याप झालेले नाही. त्यामुळे कोकण मंडळाला या घरांचा आराखडा तयार करण्यात अडचण येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर घरे उभारण्यासाठी पात्र कंपनीकडून निविदा मागविण्यात येणार आहे. यामुळे गृहनिर्माण मंत्र्यांनी जाहीर केलेल्या वेळेत घर उभारणी अशक्य झाले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आवश्यक माहिती मिळालेली नाही. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर निविदा मागविण्यात येणार आहेत.

- डॉ. नितीन महाजन - मुख्य अधिकारी- कोकण मंडळ

loading image
go to top