विवाह मंडपात रद्दी, तुळशी, अवयवदानाचा स्टॉल

अक्षय गायकवाड
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

आम्हाला अजून काही गोष्टीवर जनजागृती करायची होती जसे लहान मुलांवर होणारे अत्याचार वाढणारी हिंसा. पण वेळ कमी असल्यामुळे आम्ही ते राबवू शकलो नाही. पुढे होणाऱ्या आमच्या नातेवाईकाच्या किंवा मित्र मैत्रिणीच्या लग्नात ही जनजागृती नक्कीच करू.
- श्रद्धा जुवेकर, नववधू

या लग्नातील सामाजिक जनजागृती बघून खूप बरे वाटले. फक्त घर आणि मी या विचारातून बाहेर येऊन समाजात राहणाऱ्या गरजूंना मदत केली पाहिजे. मग ती रद्दीतून असो वा अवयवदानातून. आपण सहकार्य केले पाहिजे.
- अक्षय पाटील, पाहुणा

वधू-वराकडील मंडळींना मिळाले सामाजिक बांधिलकी जपण्याचे समाधान

विक्रोळी (मुंबई) : विवाहाच्या मंडपात रद्दी, तुळशीचे रोपे आणि अवयवदानाचा स्टॉल... हे पाहून विवाहाला येणारे अनेकजण आश्चर्यचकित होत होते. पण नंतर त्याची उपयुक्तता समजल्यानंतर वर-वधूकडील मंडळी त्यासाठी पुढाकार घेत होती. असे एक सामाजिक उपक्रमांचे लग्न भांडुपमधील हार्मोनी सभागृहात आज पार पडले आणि लग्न समारंभास उपस्थिताना आपण सामाजिक बांधिलकी जपण्याचे समाधान मिळाले

विक्रोळीतील निलेश देवळे आणि श्रद्धा जुवेकर यांनी लग्नाची खूणगाठ बांधताना सामाजिक बंधनाचीही गाठ बांधली. लग्नात अनेक जण आशीर्वाद देण्यासाठी येतात. हीच बाब या वर आणि वधूने हेरत मंडपातच दिशा वेल्फेर ग्रुप विक्रोळी, नेत्रदान फाऊंडेशन ,ठाणे, उमंग द युथ सोशल फोरम भांडूप,  यांच्या मदतीने पर्यावरण, अवयव दान, आदिवासी विद्यार्थ्यांना मदत या विषयावर जनजागृती केली.

भांडुप येथील हार्मोनी सभागृहात शुक्रवारी ता. ( 9) त्यांचे लग्न लागले. यावेळी सभागृहात 500 जण उपस्थित होते. 3 स्टॉल उभारण्यात आले होते.  तुमच्या घरातील रद्दी आम्हाला द्या, त्यातून मिळणाऱ्या मोबदल्यातुन आम्ही आदिवासी भागातील लहान मुलांना शिक्षण उपयोगी वस्तू घेऊन देऊ हे सांगणारा हा पहिला स्टॉल उमंग सोशल फोरमचा होता. दुसऱ्या स्टॉलमधील दिशा ग्रुपचे सदस्य हे येणाऱ्या पाहुण्यांना तूळशीचे भेट देऊन पर्यावरणात झाडे किती महत्त्वाची आहेत हे समजावून सांगत होते. यावेळी 350 तुळशीच्या रोपट्याचे वाटप करण्यात आले. शेवटच्या स्टॉलमध्ये अवयवदान का करावे? देहदान आणि अवयवदान यातील फरक समजवून सांगितला. त्याचे फायदे काय आहेत हे समजवण्यात आले. एका देहातून किती जणांना मदत करता येऊ शकते याचे उदाहरण यावेळी देण्यात आले. तसेच यावेळी वधुवरासह अवयवदानाचे फ़ॉम ही भरून घेण्यात आले. येणाऱ्या पाहुण्यांनी या उपक्रमात भाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला.

निलेश हा व्यवसायाने फोटोग्राफर आहे. आजूबाजूला घडणाऱ्या सुखदुःखाच्या गोष्टी तो त्याच्या कॅमेरात कैद करत असतो. श्रद्धा ही ग्राफिक्स डिझाईनर आहे. दोघांनाही समाजसेवेची आवड असल्यामुळे ते दिशा सामाजिक ग्रुपशी जोडले गेले. या नवदाम्पत्याला त्याच्या लग्नाच्या माध्यमातून काही तरी वेगळे समाजाचे हित जपणारा उपक्रम राबवायाचा होता. या कल्पनेतून त्यांनी हे उपक्रम राबिवले. या लग्न सोहळ्याला माजी महापौर दत्ता दळवी, माजी आमदार मंगेश सांगळे, नगरसेवक उपेंद्र सावंत, शंकर ढमाले,प्रथमेश राणे, समाजसेवक दिनेश बेरीशेट्टी उपस्थित होते.

Web Title: mumbai news vikhroli marriage social work