
मूळळची आगरी, कोळी व कराडी आणि ब्राह्मण समाजाची संस्कृती असलेल्या पनवेल शहराचे नावही पानवेलींवरून पडले आहे. १८५२ मध्ये पनवेल नगरपालिकेची स्थापना झाली. पनवेल ही महाराष्ट्रातील सर्वात पहिली आणि जुनी नगरपरिषद असून १९१० पासून नगरपालिका निवडणुका सुरू झाल्या. युसूफ नूर महम्मद हे पनवेलचे पहिले नगराध्यक्ष. १९१० ते १९१६ पर्यंत त्यांनी कारभार चालवला.
वाड्याच्या जागी टोलेजंग टॉवर
पनवेलला तलावांबरोबरच पुरातन आणि वैभव संपन्न वाड्यांचा वारसा लाभला आहे. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पत्नी गोपिकाबाई फडके यांचा ही वाडा आहे. बरेच क्रांतिवीर वाड्यात राहण्यासाठी आणि भूमिगत चळवळीसाठी वाड्यांचा आधार घेत. आज या वाड्याची जागा टोलेजंग टॉवर घेऊ पाहत आहे.
तळे नष्ट होण्याच्या मार्गावर
वसईतील मोहीम फत्ते करून आलेल्या चिमाजी आप्पांनी शहरात पाण्याचा स्रोत निर्माण व्हावा म्हणून बल्लाळेश्वर मंदिरासमोरील तलाव खोदले होते. याशिवाय पनवेलमध्ये इस्रायली तलावही प्रसिद्ध आहे. १४ व्या शतकात अलिबागच्या समुद्रकिनारी जात असताना नायगावजवळ खडकावर आपटून बोट फुटली. तेव्हा जवळचा किनारा म्हणून पनवेलला इस्रायली लोक राहायला आहे. पनवेलमध्ये टपाल नाक्यावर त्यांचे ‘सॅनेगॉन'' हे प्रार्थनास्थळ त्याचाच पुरावा आहे.
पनवेल शहरातील जुन्या कोर्टाच्या पाठीमागील बाजूस शिवकालापासून बंदर होते. ते एकवेळचे आरमारी ठाणेच होते. या बंदरावरून मुंबईला प्रवासी वाहतूक व्हायची. घरांवरील कौले आणि मिठाचा व्यापार जहाजामार्गे केला जात असे. बंदरावर स्वारी करायला येणाऱ्या सिद्धी जोहरचा बंदोबस्त करण्यास छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार प्रमुख दौलत खान याला पनवेलला पाठवल्याची इतिहास नोंद आहे. दौलत खान पनवेलला आल्यावर त्याने सर्वात आधी पनवेलच्या बंदरावर सुरक्षिततेकरिता लांब पल्ल्याच्या मारा करणाऱ्या १२ तोफा लावल्या. त्या तशाच मातीत पडून राहिल्याने काही इतिहास संशोधक आणि संघटनांनी कालांतराने त्या शोधून काढल्या. सध्या यातील काही तोफा महापालिकेच्या ताब्यात आहेत.
बाबासाहेबांची पाणपोई नष्ट
१९२७ हे वर्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दलित समाजाच्या क्रांतीचे होते. महाडला चवदार तळ्याच्या सत्याग्रहाबाबत बाबासाहेबांना अनेकदा मुंबई-पुणे आणि पुणे-मुंबई या मार्गावर ये-जा करावी लागत होती. असेच एकदा पुण्याहून मुंबईकडे मोटारीने जाताना, बाबासाहेबांना पनवेल येथे पोहोचल्यावर तहान लागली. बाबासाहेबांनी पनवेल शहराच्या मध्यवर्ती भागात
पोहोचल्यावर एक हॉटेल पाहून मोटार थांबवायला सांगितले. हॉटेल चालकाने बाबासाहेबांना पाणी देण्यास नकार दिला. ही बाब शेजारी लाकडे तोडणारा मजूर सोनबा येलवे यांना समजताच त्यांनी दुःख व्यक्त करीत घरून पाण्याचे भरलेला माठ आणला. पण तोपर्यंत बाबासाहेब मुंबईकडे रवाना झाले होते. आपल्याला दारिद्र्यातून बाहेर काढणारा दैवत पाण्याविना गेला, ही घटना सोनबा येलवे यांना झोपू देत नव्हती. त्यामुळे ते रोज पाण्याचा माठ घेऊन बाबासाहेबांच्या मार्गावर येऊन बसत. सलग सात वर्षे वाट पाहिल्यानंतर येलवे यांनी प्राण सोडले. ही बाब जेव्हा बाबासाहेबांना समजली तेव्हा त्यांनी येलवे यांच्या समाधीवर येऊन दुःख व्यक्त केले. त्या जागेवर पाणपोई तयार करण्याचा प्रस्ताव महापालिकेत बारगळला आहे.
पनवेल शहरातील ऐतिहासिक पाऊल खुणांचे जतन केल्यास वेगळ्या प्रकारचे पर्यटन सुरू होऊन शहराचा विकास होईल. तसेच आजच्या पिढीला पनवेल शहराचे महत्त्व समजेल. पण राज्यकर्त्यांच्या उदासीन धोरणामुळे पनवेलचा ऐतिहासिक ठेवा नष्ट होत चालल्याची खंत आहे.
- सुधाकर लाड, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, पनवेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.