Mumbai : रिक्षांमुळे होतोय प्रवाशांना त्रास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

Mumbai : रिक्षांमुळे होतोय प्रवाशांना त्रास

मुंबई : मुंबईतील कोणत्याही रेल्वेस्थानकात गर्दी ही प्रवाशांच्या पाचवीलाच पुजलेली आहे. त्यात रिक्षांची भर पडत असते. लॉकडाऊन शिथिल होताना रिक्षांची गर्दी पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील प्रमुख रेल्वेस्थानकांभोवती उभ्या राहणाऱ्या बेशिस्त रिक्षांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

मुंबईतील कोणत्याही रेल्वेस्थानकात गर्दी ही प्रवाशांच्या पाचवीलाच पुजलेली आहे. त्यात रिक्षांची भर पडत असते. लॉकडाऊन शिथिल होताना रिक्षांची गर्दी पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील प्रमुख रेल्वेस्थानकांभोवती उभ्या राहणाऱ्या बेशिस्त रिक्षांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

मुंबईतील कोणत्याही रेल्वे स्थानकाभोवतीची सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वीची जुनी बांधकामे, अतिक्रमणे, त्या वेळेच्या वाहतुकीच्या दृष्टिकोनातून केलेले जेमतेम पंधरा फूट रुंद रस्ते आणि वाढलेल्या वाहनांमुळे आणि पादचाऱ्यांमुळे होणारी गर्दी, त्यातच फेरीवाल्यांची भर, यामुळे प्रवाशांना रेल्वेस्थानकात येणे आणि तिथून बाहेर पडणे हे मोठ्या चक्रव्यूहासारखेच वाटते. त्यात वाटेल तिथे बेशिस्तपणे उभे राहणारे रिक्षावाले हा मोठा त्रास आहे.

वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला आपल्याला याचा सर्वात वाईट अनुभव येतो. आपण सकाळी महाविद्यालयात किंवा कामावर जायला शेअर रिक्षा किंवा साधी रिक्षा करून निघतो. आपल्या परिसरातील मुख्य रस्ता म्हणजे हायवे किंवा एसव्ही रोड - एलबीएस रोड ओलांडेपर्यंत रिक्षाचा प्रवास वेगवान होतो; पण हे रस्ते ओलांडून आपण रेल्वे स्थानकांच्या दिशेने आलो की हळूहळू परिसरातील वाहनांची आणि पादचाऱ्यांची आणि फेरीवाल्यांची गर्दी वाढते. जसे आपण रेल्वे स्थानकाच्या जवळ येतो तसे रिक्षांची कोंडी झाल्याचे दिसते. त्यामुळे आपला वेग मंदावतो. यामुळे आपली नेहमीची गाडी चुकल्याचे आणि आपल्याला उशीर झाल्याचे अनेकदा अनुभवास येते.

हेही वाचा: देवेंद्र फडणवीसांनी एसटीचे केल वाटोळं; एसटी कर्मचारी संघटना संतापल्या

गोरेगाव रेल्वे स्थानकाचा परिसरही यास अपवाद नाही. रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या स्टेशन रोड, आरे रोड आणि अंबाबाई माता देऊळ रोड या तीन रस्त्यांवरून रिक्षा गोरेगाव स्थानकाकडे येतात. चौथ्या मुख्य रस्त्यावरून फक्त बेस्ट बस येऊ शकतात. हे तिन्ही रस्ते जुने असल्यामुळे त्याच्या दोन्ही बाजूला ७०-८० वर्षे जुनी असलेली दुकाने व इमारती यांची गर्दी आहे. पदपथांवरील त्यांच्या अतिक्रमणामुळे हे रस्ते आणखीनच अरुंद झाले आहेत. त्यातच रिक्षावाल्यांना रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच उभे राहून प्रवासी घेण्याची घाई असल्यामुळे सगळे रिक्षावाले तेथेच उभे राहतात. त्यामुळे येथे नऊ वाजल्यानंतर अकरा वाजेपर्यंत रिक्षांची प्रचंड वाहतूक कोंडी झालेली असते. या रिक्षांच्या गर्दीतून चालत जाणेही कठीण होते.

गोरेगावमध्ये ग्रामपंचायत रोडचा पर्याय

रिक्षाच्या कोंडीवर एक उपाय म्हणजे या अरुंद रस्त्यांभोवतीचा परिसराचा पुनर्विकास करून हे रस्ते रुंद करणे हा आहे. अर्थात यासाठी सरकारने आणि महापालिकेने इच्छाशक्ती दाखवली व लोकप्रतिनिधींनी त्याला मदत केली, तर हे काम त्वरेने होऊ शकते. मात्र हे किचकट काम करण्यात कोणालाही रस नसल्यामुळे हा प्रश्न वर्षानुवर्षे तसाच प्रलंबित आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत याच गर्दीच्या परिसराच्या शेजारी जे रस्ते तुलनेने मोकळे आहेत, तेथे या रिक्षावाल्यांच्या रांगा उभ्या करता येतील. उदाहरणार्थ गोरेगाव स्टेशन रोडवर रिक्षांची गर्दी असते; पण तेथूनच रेल्वेस्थानकाला लागूनच बोरिवलीच्या दिशेने जाणारा ग्रामपंचायत रोड हा तसा रिकामाच असतो. त्यामुळे त्या दिशेने जाणाऱ्या रिक्षांची रांग स्टेशन रोडवर उभी करण्याऐवजी ग्रामपंचायत रोडवर उभी केली, तर स्टेशन रोडवरची वाहतूक कोंडी टळू शकते.

अर्धे-अर्धे रिक्षा स्टँड अन्यत्र हलवल्यास

अंबाबाई रोड परिसराची अशीच स्थिती आहे. झोपड्यांचे अतिक्रमण झाल्याने हा रस्ता अरुंद आहे. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यावर पर्याय म्हणजे शास्त्रीनगर व भगतसिंगनगरच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षा या गजानन कॉलनी परिसरात उभ्या केल्या, तर प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही किंवा वळसा पडणार नाही.

उलट वाहतूक कोंडीचा फार मोठा त्रास वाचेल. रेल्वेस्थानकाला समांतर असलेला चर्चगेटच्या दिशेने जाणारा गजानन कॉलनीचा रस्ता अत्यंत शांत असून तेथे अन्य कोणत्याही वाहनांची वर्दळ नाही. त्यामुळे वरील दोन ठिकाणी जाणाऱ्या रिक्षा तेथे उभ्या केल्यास अंबाबाईच्या देवळाशेजारी बांगूरनगर व अन्यत्र जाणाऱ्या रिक्षा उभ्या करता येतील किंवा रेल्वे स्थानकाच्या समोर अन्यत्र जाणाऱ्या रिक्षा उभ्या करता येतील. अशा प्रकारे अर्धे-अर्धे रिक्षा स्टँड अन्यत्र हलवल्यास वाहतूक कोंडीचा त्रास नष्ट होऊ शकतो. मात्र त्यासाठी प्रशासनाने इच्छाशक्ती दाखवणे गरजेचे आहे.

loading image
go to top