esakal | रेमडेसिव्हीरचा काळबाजार, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

बोलून बातमी शोधा

रेमडेसिव्हीर
रेमडेसिव्हीरचा काळबाजार, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
sakal_logo
By
अनिष पाटील

मुंबई: कोरोना व्हायरसवरील उपचारांमध्ये उपयुक्त ठरणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा सध्या प्रचंड तुटवडा आहे. हे इंजेक्शन मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना तासनतास रांगा लावाव्या लागत आहेत. वणवण भटकावे लागतेय. रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यावरुनही सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये जोरदार राजकारण सुरु आहे. त्यावरुन या इंजेक्शनचं महत्त्व लक्षात येतं.

रेमडेसिव्हीर इंजेक्शन इतके निकडीचे बनल्याने त्याचा काळाबाजारही जोरात सुरु आहे. रेमडेसिव्हीरचा साठा करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी आधीच दिला आहे. आज पोलिसांनी मुंबईत बेकायदेशीर साठा करुन ठेवलेले 2200 रेमडेसिव्हीर इंजेक्शन जप्त केले. पोलीस आणि अन्न-औषध प्रशासनाने संयुक्तपणे ही कारवाई केली.

हेही वाचा: अरे बापरे! महाराष्ट्रात ऑक्सिजनची मागणी १३० टक्क्यापेक्षा जास्त

अंधेरीतील मरोळ आणि मरीन लाईन्स परिसरात छापा मारुन पोलिसांनी रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या व्हायल्स जप्त केल्या. मरोळ परिसरातून रेमडेसिव्हीरच्या 2000 व्हायल्स जप्त करण्यात आल्या, तर मरीन लाईन्स परिसरातून 200 व्हायल्स जप्त केल्या. सर्व व्हायल्स एफडीएकडे सोपवण्यात आल्या असून योग्य त्या पद्धतीने हॉस्पिटलला दिल्या जातील असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.