esakal | अरे बापरे! महाराष्ट्रात ऑक्सिजनची मागणी १३० टक्क्यापेक्षा जास्त

बोलून बातमी शोधा

oxygen
अरे बापरे! महाराष्ट्रात ऑक्सिजनची मागणी १३० टक्क्यापेक्षा जास्त
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: राज्यात दररोज कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. त्याचबरोबर ऑक्सिजनची मागणी देखील वाढली आहे. केंद्राने महाराष्ट्र सरकारला ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्यात ऑक्सिजन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मुबलक उपलब्धता ठेवण्यावर महाराष्ट्र सरकारचा भर आहे. राज्यात ६ लाख ७६ हजार ५२० सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. सध्या ऑक्सिजन पुरवठ्याचे प्रमाण लक्षात घेतले तर, पुढच्या १५ दिवसात लिक्विड मेडीकल ऑक्सिजनची कमतरता भासू शकते.

राज्यात लिक्विड मेडीकल ऑक्सिजनची मागणी १३० टक्क्यापेक्षा जास्तने वाढली आहे. मागच्या दोन आठवड्यात ६५० मेट्रीक टनवरुन १५०० मेट्रीक टन एवढी राज्यात ऑक्सिजनची गरज निर्माण झाली. एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. १८ एप्रिलला राज्यात सर्वाधिक ६८ हजार ६३१ कोरोनाबाधितांची नोंद झाली. दररोज १५ टक्के कोरोना रुग्णांना ऑक्सिजन लागतोय. हेच प्रमाण वाढत राहिले तर पुढच्या काही दिवसात ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढू शकते असे अन्न आणि औषध मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.

हेही वाचा: पुण्यात जनरल मोटर्सने 1419 कामगारांना नोकरीवरुन काढलं

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे राज्याला ऑक्सिजनची कमतरता जाणवू शकते. महिना अखेरीस राज्याला २१०० ते २२०० मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज लागेल असे सरकारचा अंदाज असल्याचे राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. १२ राज्य आणि केंद्रामध्ये झालेल्या बैठकीत ६,१७७ मेट्रीक टन ऑक्सिजनचे वितरण करण्याचे निश्चित झाले आहे.

हेही वाचा: फडणवीसांच्या पुतण्याला लस मिळतेच कशी?, काँग्रेसचा सवाल

महाराष्ट्राला सर्वाधिक १५०० मेट्रीक टन, दिल्लीला ३५० मेट्रीक टन आणि उत्तर प्रदेशला ८०० मेट्रीक टन ऑक्सिजन देणार असल्याचे गोएल यांनी रविवारी एएनआयला सांगितले. महाराष्ट्रासह देशातही यापुढे होणाऱ्या ऑक्सिजन निर्मितीचा सर्व वापर वैद्यकीय क्षेत्रासाठी केला जाणार आहे. महाराष्ट्राची स्वत:ची क्षमता १२०० मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मितीची आहे. ऑक्सिजनची निकड लक्षात घेऊन, केंद्र सरकारनेही अन्य देशांकडून ५० हजार मेट्रीक टन ऑक्सिजन आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.