मुंबई : सायबर सेलकडून फसवणुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश; दोन बँक कर्मचाऱ्यांसह 16 जणांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून फसवणुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन बँक कर्मचाऱ्यांसह 16 जणांना अटक केली आहे.

मुंबई : सायबर सेलकडून फसवणुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश; दोन बँक कर्मचाऱ्यांसह 16 जणांना अटक

मुंबई - मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून फसवणुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन बँक कर्मचाऱ्यांसह 16 जणांना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या मालाड येथील एका व्यक्तीची 34 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने तपास करत एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांच्या कारवाईत दोन बँक कर्मचाऱ्यांसह 16 जणांना अटक झाली आहे.

गुंतवणूकीचे आमिष

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मोठ्या रकमेचे कमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवून पीडितेला ई-कॉमर्स कंपनीत पैसे गुंतवण्यास सांगितले. तक्रारदाराने अमिषास बळी पडून सुरुवातीला 26 लाख रुपयांची गुंतवणूक आरोपीने दिलेल्या बनावट ॲपच्या अर्जाद्वारे केली. त्याला अॅपवर मिळालेला ‘नफा’ दिसत असला तरी तो रक्कम काढू शकत नव्हता. नंतर त्याने पैसे काढण्यासाठी आरोपीला अतिरिक्त रक्कम दिली परंतु महिना उलटूनही आरोपी न भेटल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि ऑगस्टमध्ये सायबर युनिटकडे तक्रार दाखल केली होती.

पोलिसांचा तपास

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या सायबर टीमचे विशेष पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी तक्रारदाराच्या बँक व्यवहाराचे तपशील गोळा केले आणि तक्रारदाराच्या खात्यातून हस्तांतरित केलेले पैसे 29 बँकांमधील 50 हून अधिक खात्यांमध्ये गेल्याचे समजले. ही सर्व खाती ज्या कागदपत्रांचा वापर करत उघडण्यात आली, त्या कागदपत्रांची पोलिसांनी तपासणी केली असता ती बनावट निघाली. त्यानंतर अधिकार्‍यांनी खात्यांशी जोडलेल्या सर्व मोबाईल नंबरचे कॉल डिटेल रेकॉर्ड मिळवले आणि 20 ऑक्टोबर रोजी मीरा भाईंदर येथून पाच आरोपींना पकडले.

बँक कर्मचाऱ्यांशी संगनमत

भायंदर येथून अटक पाच आरोपीकडे चौकशी केली असता त्याना बनावट कागदपत्रांच्या मदतीने बँक खाते उघडण्यासाठी आणि सिमकार्ड देण्यासाठी पैसे दिले गेले. त्यांना एकच खाते उघडण्यासाठी 10,000 ते 15,000 रुपये मिळत होते. अटक करण्यात आलेले बँक कर्मचारी वेगवेगळ्या संस्थांसाठी काम करत असून त्यांनी खाती उघडण्यासाठी आरोपींशी हातमिळवणी केली होती. या रॅकेटचा मास्टरमाईंड अजूनही फरार असून ते विविध राज्यांतून रॅकेट चालवत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले असून पोलीस म्होरक्याचा शोध घेत आहे.