
Mumbai: बनावट चावीच्या आधारे भाच्याने केली मावशीच्या घरात चोरी
डोंबिवली- डोंबिवली पूर्वेत राहणाऱ्या पूजा श्रृंगारे यांच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली होती.
घरात कोणत्याच वस्तूचे काही नुकसान न झाल्याने ओळखीतील लोकांकडूनच ही चोरी झाल्याचा संशय पोलिसांना होता.
त्याआधारे तपास केला असता पूजा यांच्या अल्पवयीन भाच्यानेच मित्राच्या सहाय्याने बनावट चावीच्या आधारे घरातील 2 लाखाचे दागिने चोरल्याचा प्रकार समोर आला. रामनगर पोलिसांनी भाच्यासह त्याचा मित्र अनिकेत खंडागळे याला अटक केली आहे.
डोंबिवलीत राहणाऱ्या पूजा यांच्या घरातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला.
घटनास्थळाची पाहणी केली असता घराचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे ओळखीतील लोकांकडून ही चोरी झाल्या असल्याचा संशय पोलिसांना आला.
पोलिसांनी फिर्यादी पूजाकडे अधिक चौकशी केली असता त्यांचा भाचा व बहिण नमिता श्रृंगारे या सातत्याने त्यांच्या घरी येत असल्याचे पोलिसांना समजले.
पोलिसांनी भाचाकडे तपास केला असता त्याने त्याचा मित्र अनिकेत याच्या मदतीने घराची व कपाटाची बनावट चावी तयार केली. घरात कोणी नसल्याची संधी साधत त्याने सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली.
ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मित्र अनिकेतचा शोध सुरु केला. गुप्त बातमीदार मार्फत पोलिसांना अनिकेत हा ठाकुर्ली परिसरात असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक योगेश सानप, बळवंत भराडे,पोलीस हवालदार विशाल वाघ,प्रशांत सरनाईक,शिवाजी राठोड, नितीन सांगळे,यांनी सापळा रचत आरोपीला अटक केली.
त्याच्याकडून चोरी केलेले 2 लाख 10 हजार रुपये किंमतीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. आरोपी भाचा हा अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी ही बालसुधार गृहात करण्यात आली आहे.
अटक आरोपींचा आणखी कोणत्या गुन्ह्यात सहभाग आहे का याचा अधिक तपास रामनगर पोलिस करत असल्याची माहिती डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिली.