भाजपचा महाविकास आघाडीला खणखणीत टोला, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर भातखळकर कडाडले

कृष्ण जोशी
Friday, 22 January 2021

मुंबईतील अमली पदार्थांचे कारखाने नष्ट करण्याचे काम केंद्रीय अमली पदार्थ विरोधी दलाला करावे लागले.

मुंबई  : मुंबईतील अमली पदार्थांचे कारखाने नष्ट करण्याचे काम केंद्रीय अमली पदार्थ विरोधी दलाला करावे लागले. मग राज्याचे गृहखाते आणि मुंबई पोलिसांचे अमलीपदार्थ विरोधी पथक झोपले आहे का? अशा स्थितीत निदान मुख्यमंत्र्यांनीच कायदा व सुव्यवस्थेचे काम सांभाळावे, अशी जळजळीत टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दलाच्या विशेष पथकाकडून, मुंबईच्या डोंगरी विभागातील नूर मंजिल इमारतीत छापा टाकून एमडी ड्रग्स चा कारखाना उध्वस्त करण्याचे काम करण्यात आले. मुंबईत अशा प्रकारे अंमली पदार्थाचे कारखाने उभे राहत असताना महाराष्ट्राचे गृहखाते आणि अंमलीपदार्थ विरोधी पथक काय करत होते ? राज्याच्या गृहमंत्र्यांना आपली जबाबदारी ओळखता येत नाही काय, ते फक्त सूडाचे राजकारण करण्यात गुंतले आहेत का, अशा प्रश्नांची फैरही भातखळकर यांनी झाडली आहे. 

Video : देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई निष्फळ ; अण्णा हजारे उपोषणावर ठाम

एका आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दलाचे विशेष पथक ऑगस्ट मध्ये महाराष्ट्रात आले होते. राज्यातील बॉलीवूड व उद्योग विश्वात वाढत चाललेले अमली पदार्थांचे जाळे या पथकाने उध्वस्त केले. किमान त्यांनंतर तरी राज्याच्या गृह विभागाकडून मुंबईसह महाराष्ट्रातील अंमली पदार्थांची पाळेमुळे शोधून काढण्याची आवश्यकता होती, अशी टीकाही भातखळकर यांनी केली आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे काल एनसीबी कडून उघड केलेला हा कारखाना मागील वर्षभरापासून तिथे चालू होता हे सुद्धा उघडक झाले आहे. केंद्रीय पथकाकडून मागील 6 महिन्यात 20 पेक्षा अधिक ठिकाणी छापे मारून करोडो रुपयांचे अंमली पदार्थ उध्वस्त करण्यात आले. यात अनेक मोठ्या व प्रसिध्द व्यक्तींचा सहभाग असल्याचे सुद्धा उघडकीस आले आहे. मुंबई सारख्या शहरात इतकी देशविघातक कृत्ये होत असताना राज्याचा गृह विभाग केवळ बघ्याची भूमिका पार पाडत आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ड्रग्सचे उत्पादन व तस्करी या विरोधात जोरदार कारवाई करणे अपेक्षित असताना गृहमंत्रीसुद्धा केवळ राजकीय वक्तव्य करण्यात मशगुल आहेत, असेही भातखळकर यांनी म्हटले आहे. 

मुंबईतील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून मुंबईत गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. दिवसाढवळ्या खून, बलात्कार, उद्योजक व राजकीय नेत्यांना खंडणीसाठी धमक्या देणे, अपहरण या आणि अशा गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालेले आहे. राज्याचे गृहमंत्री हे केवळ सुडाचे राजकारण करण्यात मग्न आहेत. त्यामुळे किमान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तरी मुंबईतील वाढत चाललेली अंमली पदार्थांची खुलेआम विक्री आणि गुन्हेगारी कमी करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे असा सल्लाही भातखळकर यांनी दिला आहे.

( संपादन - सुमित बागुल )

mumbai political news atul bhatkhalkar targets cm uddhav thackeray and anil deshmukh


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai political news atul bhatkhalkar targets cm uddhav thackeray and anil deshmukh