डोंबिवलीत मनसेला सावरण्याची जबाबदारी पुन्हा मनोज घरत यांच्या खांद्यावर

डोंबिवलीत मनसेला सावरण्याची जबाबदारी पुन्हा मनोज घरत यांच्या खांद्यावर

डोंबिवली - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता पक्षातील महत्त्वाची पदे खाली झाली आहेत. डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने आता डोंबिवली शहर अध्यक्षपदी पुन्हा मनोज घरत यांची वर्णी लागली आहे. मंगळवारी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते मनोज घरत यांना डोंबिवली शहर अध्यक्ष नियुक्तीपत्र मंगळवारी देण्यात आले. आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणने त्यादृष्टीने संघबांधणी करण्याकडे आता आम्ही लक्ष देणार असून, कोणाच्या जाण्याने पक्षाला काहीही फरक पडत नसल्याचे यावेळी मनोज घरत यांनी सांगितले. 

मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी सोमवारी रात्री पक्षाला रामराम करीत शिवसेनेत प्रवेश केला. मंगळवारी सकाळी मनसेचे माजी विरोधी पक्षनेते व गटनेते मंदार हळबे यांनीही पक्षाला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश केला. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील दोन महत्त्वाच्या व्यक्तींनी लागोपाठ पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने आता पक्षाला सावरण्याचे मोठे काम एकमेव आमदार राजू पाटील यांना करायचे आहे. मंगळवारी सकाळीच आमदार राजू पाटील यांनी कृष्णकुंजवर जाऊन पक्षअध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली आहे. राजेश कदम यांच्यानंतर रिक्त झालेले डोंबिवली शहर अध्यक्ष पदाची धुरा पुन्हा मनोज घरत यांच्याकडे देण्यात आली आहे. मनसेच्या पडत्या काळात तीन वर्षे मनोज घरत यांनी डोंबिवली शहर अध्यक्षपदाची धूरा सांभाळली होती. त्यानंतर राजेश कदम यांच्याकडे हे पद गेले होते, तर मनोज घरत यांची कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली होती. आता राजेश कदम यांनी पक्ष सोडल्यानंतर पुन्हा शहर अध्यक्षपदाची धूरा घरत यांच्यावर सोपविण्यात आली आहे. 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या आधीच पक्षात मोठी उलथापालथ झाली असताना आता शहराची धूरा घरत यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. हे आव्हान ते कसे पेलणार याविषयी त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले, 2010 साली मनसेचे 28 नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर 2015 साली मनसेची बाजू थोडी पडती झाली आणि 9 नगरसेवक निवडून आले. 2010 सालच्या निवडणुकीप्रमाणेच तेवढे किंवा त्यापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याचे आमचे ध्येय्य असून आगामी निवडणूकीवर आता आमचा फोकस असणार आहे. त्यादृष्टीने संघटना बांधणी सुरु होणार आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता हा पक्षाला आणि राज ठाकरे यांना बांधिल असून तो पक्षासोबतच आहे, त्यामुळे कोणाच्या जाण्याने पक्षाला काहीही फरक पडत नसल्याचे घरत यांनी सांगितले.

----------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे 

mumbai political news Manoj Gharat again as Dombivli city president of MNS

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com