esakal | सकाळ सन्मान सोहळा | नागरिकांची चिंता दूर करणाऱ्यांचा सन्मान : शरद पवार
sakal

बोलून बातमी शोधा

सकाळ सन्मान सोहळा | नागरिकांची चिंता दूर करणाऱ्यांचा सन्मान : शरद पवार

'संकटकाळात समाजाला मदत करणारे योद्धे नव्या पिढीला प्रेरणा देतात. अशांची निवड करून त्यांचा सन्मान केला हा आनंदाचा क्षण आहे. असे शरद पवार यांनी 'सकाळ सन्मान सोहळ्या'त म्हटले.

सकाळ सन्मान सोहळा | नागरिकांची चिंता दूर करणाऱ्यांचा सन्मान : शरद पवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


मुंबई  - कोरोना काळात आपला जीव धोक्‍यात घालून कठोर परिश्रम करून जनतेला सुरक्षित ठेवणाऱ्या सर्वसामान्य शवागार कर्मचाऱ्यापासून ते वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्राचे गृहमंत्री, आरोग्यमंत्री या अशा 31 सेवाव्रतींचा गौरव "सकाळ सन्मान-2021' या बहारदार कार्यक्रमात झाला अन्‌ सकाळ माध्यम समूहाच्या सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेमुळे सारेच जण भारावून गेले. 

मुंबईतील प्रभादेवीच्या रवीद्र नाट्यमंदिरात शनिवारी (ता. 30) झालेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर या सर्वांनीच या व पडद्यामागे काम करणाऱ्या अशाच असंख्य अनामवीर कोरोनायोद्‌ध्यांच्या परिश्रमांचा मुक्तकंठाने गौरव केला. तसेच या कोरोनायोद्‌ध्यांच्या सन्मानाच्या माध्यमातून असंख्य लोकांना प्रोत्साहन देणाऱ्या "सकाळ'च्या या प्रयत्नाचेही कौतुक केले. 
 

सकाळ सन्मान सोहळा | ''सकाळची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद''; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सकाळ सन्मान सोहळा | आरोग्यदायी महाराष्ट्र हेच आपले व्हिजन; आरोग्य मंत्री राजेश टोपे

''अडचणीतल्या लोकांच्या मागे उभे राहण्याचे, त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचे काम "सकाळ' माध्यमसमूहाने नेहमीच अनेक उपक्रमांद्वारे केले आहे. गेले वर्षभर कोरोना संकटामुळे चिंतीत असलेल्या नागरिकांची चिंता दूर करण्याचे काम करणाऱ्या कोरोना योद्‌ध्यांमधील काहींचा हा सन्मान आहे'', असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बोलून दाखवले. 
''संकटकाळात समाजाला मदत करणारे योद्धे नव्या पिढीला प्रेरणा देतात. अशांची निवड करून त्यांचा सन्मान केला हा आनंदाचा क्षण आहे. या सत्कारासाठी शेकडो कोरोनायोद्धे पात्र आहेत. मात्र सर्वांचीच यासाठी निवड करता येणार नाही. कोरोना काळात सरकारच्या प्रतिनिधींनी चांगली कामगिरी केली. मुख्यमंत्र्यांनीही या काळात ज्या-ज्या जिल्ह्यांमध्ये प्रश्न आहेत, ते सोडविण्याची पराकाष्ठा केली. सत्कारमूर्तींसह सर्वच मंत्र्यांनी अखंड काम केले. नाशिकचे घर सोडून मालेगावला राहणाऱ्या आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्यासारखी शेकडो लहानथोरांची उत्तम कामाची उदाहरणे आहेत. त्यांच्यामुळेच आपण हळूहळू कोरोना संकटातून बाहेर पडतो आहोत. कित्येक लोकांनी जनतेसाठी काम केले, सर्वांचे सहकार्य मिळाले, स्वयंसेवी संस्थांनी पुढे येऊन प्रयत्न केले. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच महाराष्ट्राची स्थिती सुधारली, हे प्रयत्न करणारे सर्वच जण कोरोना योद्धे आहेत'', अशा शब्दांत पवार यांनी सर्वांचे कौतुक केले. 

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Sakal sanman sohala Honoring those who alleviate citizens worries said Sharad Pawar