धनिकांच्या सोईसाठी मुंबई-पुणे महामार्ग अरुंद? 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

जुन्या महामार्गावर खालापूर ते खोपोली फाटा एकच मार्गिका होती. शिवाय पुढे खोपोली फाटा ते खोपोली गाव दोन वेगळ्या मार्गिका असल्या तरी रस्ता अरुंद असल्याने अपघाताचे प्रमाण जास्त होते. महामार्ग रुंद आणि वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका असाव्यात, अशी मागणी अनेक वर्षे होती.

खालापूरः मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे; मात्र खालापूर ते खोपोलीदरम्यान मधेच काही धनिकांच्या सोईसाठी रस्त्याची रुंदी कमी केली जात असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. त्यामुळे हे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, कामाच्या दर्जाबाबत प्रश्‍न उपस्थित होत आहे. महामार्ग अरुंद राहिल्यास भविष्यात अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष घालावे, या मागणीला जोर आला आहे. 

रवी पुजारीला ताब्यात घेण्यासाठी प्रतीक्षा

जुन्या महामार्गावर खालापूर ते खोपोली फाटा एकच मार्गिका होती. शिवाय पुढे खोपोली फाटा ते खोपोली गाव दोन वेगळ्या मार्गिका असल्या तरी रस्ता अरुंद असल्याने अपघाताचे प्रमाण जास्त होते. महामार्ग रुंद आणि वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका असाव्यात, अशी मागणी अनेक वर्षे होती. अखेरीस माजी आमदार सुरेश लाड यांच्या प्रयत्नांनी रस्त्याला निधी मंजूर झाला. अडीच वर्षांपूर्वी कामाला सुरुवातही झाली; परंतु ठेकेदाराच्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याने दोन वर्षे सतत पावसाळ्यात रस्ता वाहून गेला. आंदोलन, मोर्चानंतर ठेकेदार सध्या वठणीवर आला असला तरी कामाची संथ गती आणि कामात नियम पाळताना हलगर्जी यामुळे रस्ता कधी पूर्ण होईल, याची शाश्‍वती नाही.

रस्त्याची एक मार्गिका नऊ मीटरची असताना खोपोली फाट्यापासून गावात सात मीटरची ठेवण्यात आली होती. काही व्यावसायिक आणि धनिकांच्या बांधकामाला धक्का लागू नये यासाठी रस्ता दोन-दोन मीटरने कमी झाल्यानंतर त्याविरोधात आवाज उठविण्यात आला होता. त्यानंतर जवळपास वर्षभर काम बंद राहिले होते. अखेरीस नऊ मीटरचा रस्ता करण्याचा दबाव आल्यानंतर ठेकेदाराला सात मीटरवर बांधलेली कॉंक्रीट गटार तोडून नऊ मीटरवर बांधावी लागण्याची नामुष्की ओढावली होती. सध्या वाहतुकीने अत्यंत गजबज असलेल्या भारत संचार निगम ते अल्ट्रा कंपनी पुढील टप्पा सुरू आहे. या ठिकाणी अद्याप रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारी बांधकामे तोडण्यात होत असलेली दिरंगाई संशयाला जागा निर्माण करीत आहे. अद्याप खालापूरच्या मार्गिकेत गटार बांधकाम झाले नसून संरक्षक भिंत तोडण्यात आल्या नाहीत. 

रस्ता नियमानुसार नऊ मीटरचा व्हायला पाहिजे. या ठिकाणी बाजूपट्टीही नसल्याने वाहतुकीची समस्या कायम आहे. त्यामुळे कोणालाही झुकते माप न देता रस्ता रुंदीकरण तातडीने व्हायला पाहिजे. 
- नंदकुमार दळवी, खालापूर, सामाजिक कार्यकर्ते 

अडथळा ठरणारी बांधकामे तोडण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे. भारत संचार निगम व मॉल यांच्या भिंतीपासून आत अडीच मीटरपर्यंत जागा मोकळी करण्यात येणार आहे. याबाबतची कारवाई लवकरच सुरू होईल. 
- ए. खान, ठेकेदार 
महामार्गावर अपघात कमी होण्यासाठी रुंदीकरण सुरू आहे; मात्र खालापूर-खोपोलीदरम्यान याला हरताळ फासला जात आहे. त्यामुळे यावर कार्यवाही होणे गरजेचे आहे. 
- सुरेश गावडे, माहिती अधिकार कार्यकर्ते, खालापूर 

महामार्गाचे काम नियमानुसार होईल याकडे लक्ष दिले जात आहे. त्यामुळे काही त्रुटी राहिल्या असल्यास ठेकेदाराला सूचना करण्यात येतील. 
- एस. सावंत, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai-pune road work issue