esakal | रवी पुजारीला ताब्यात घेण्यासाठी प्रतीक्षा 
sakal

बोलून बातमी शोधा

file

मुंबईसह परराज्यातही हत्या व खंडणीचे गुन्हे असल्याने प्रक्रियेला विलंब 

रवी पुजारीला ताब्यात घेण्यासाठी प्रतीक्षा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे  : अंडरवर्ल्डमधील कुख्यात गॅंगस्टर रवी पुजारी याचा ताबा मिळवण्यासाठी ठाणे पोलिसांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. यापूर्वीच सहा गुन्ह्यांत मोक्का लागलेल्या रवी पुजारी याला नुकतीच डकारची राजधानी सेनेगलमधून अटक करण्यात आली. त्यानंतर ठाणे पोलिसांनी राज्य शासनाच्या गृहविभागासह संबंधित न्यायालयाकडे पुजारी याला ताब्यात घेण्यासाठी पत्रव्यवहार केला; मात्र पुजारीविरुद्ध हत्या, हत्येच्या प्रयत्नासह खंडणीचे अनेक गुन्हे मुंबई, ठाणेसह परराज्यातील पोलिस ठाण्यात दाखल आहेत. त्यामुळे त्याचा ताबा मिळण्यासाठी ठाणे पोलिसांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हेही महत्वाचे...ठाकरे सरकार देणार मुस्लीम समाजाला गिफ्ट 

ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत रवी पुजारीविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांत 25 च्या आसपास गुन्हे दाखल आहेत. परदेशात बसून बांधकाम व्यावसायिक, व्यापारी, राजकीय लोकप्रतिनिधी आदींना खंडणीसाठी धमकावणारा रवी पुजारी याला सेनेगलमध्ये अटक झाल्यानंतर नुकतेच त्याला भारतात आणण्यात आले. त्याच्याविरोधात मुंबई, गुजरात, कर्नाटक, दिल्ली, केरळ आदी ठिकाणी खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. रवी पुजारी याच्या गुन्ह्यांचा आलेख मोठा असून यामध्ये खंडणीचे सर्वाधिक गुन्हे आहेत.


भारतातील हस्तकांकडून व्यावसायिकांची माहिती मिळाल्यानंतर आंतरराष्ट्रीय फोनवरून तो धमकी देत असे. तसेच हत्या, हत्येच्या प्रयत्नाचेही गुन्हे असून सर्व गुन्हे जुने आहेत. यापूर्वी सहा गुन्ह्यांमध्ये पुजारीला मोक्का लागला आहे. यातील पाच गुन्हे ठाणे खंडणीविरोधी पथकाकडे चौकशीसाठी प्रलंबित असून मोक्काचे उर्वरित गुन्हे उल्हासनगरमधील आहेत. 

हेही महत्वाचे...क्रिकेट खेळताना तरुणाचा मृत्यू 


काही महिन्यांपूर्वी पुजारी याने ठाण्यातील एका नगरसेवकाला खंडणीसाठी धमकावले होते. त्यानुसार, त्याच्या येथील हस्तकांच्या मुसक्‍या ठाणे खंडणीविरोधी पथकाने आवळल्या आहेत. मध्यंतरीच्या काळात पुजारीच्या धमक्‍या वाढीस लागल्या होत्या. त्यामुळे त्याच्या दिल्लीतील दोन बहिणींना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दोन दिवस चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून दिले. तेव्हा काही काळासाठी धमक्‍यांचे सत्र थांबले होते. मात्र पुन्हा, धमकीसत्र सुरू झाले. 

सध्या कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात 
दरम्यान, पुजारीच्या प्रत्यार्पणाबाबत खंडणीविरोधी पथकाने यापूर्वी केंद्रीय गृह मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला होता; तर आताही राज्याच्या गृह विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. सध्या पुजारी कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यानंतर इतर राज्यातील पोलिसही चौकशीसाठी ताब्यात घेतील. तेव्हा पुजारीचा ताबा मिळण्यासाठी ठाणे पोलिसांना काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागेल. यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्‍यता ठाणे खंडणीविरोधी पथकातील अधिकारी राजकुमार कोथमिरे यांनी व्यक्त केली आहे.