
Scholarship Exam: शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त टिप्स
Scholarship Exam Study Tips- भविष्यात येणाऱ्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची पहिली पायरी आणि शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षा अशी ओळख असणारी शिष्यवृत्ती परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या रविवारी (ता. १२) एकाच दिवशी होत आहे.
शाळांमध्ये लाखो विद्यार्थ्यांकडून प्रश्नसंच सोडविणे, सराव परीक्षा घेणे, विद्यार्थ्यांना टिप्स देणे या पद्धतीने शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करवून घेण्यात येत असून ही तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) येत्या रविवारी होत आहे. कोणताही ताण न घेताना आणि मोठ्या आत्मविश्वासाने विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी, असा सल्लाही शिक्षकांनी दिला आहे.
विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त टिप्स
विद्यार्थ्यांनी शालेय पाठ्यपुस्तके काळजीपूर्वक वाचावीत
जास्तीत जास्त सराव प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवाव्यात
अभ्यासक्रमातील अवघड वाटणाऱ्या भागाची अधिकाधिक उजळणी करावी
परीक्षेवेळी ही काळजी घ्यावी
प्रश्न काळजीपूर्वक वाचावेत आणि सोडवावेत
प्रश्न सोडविल्यानंतर लगेच त्याचे उत्तर उत्तरपत्रिकेत अचूक नोंदवावे
उत्तरपत्रिकेतील वर्तुळे रंगविण्यासाठी बॉलपेन वापरावा
उत्तरपत्रिकेतील गोल व्यवस्थित रंगवावेत
वेळ आणि प्रश्न सोडविणे यांची योग्य सांगड घालावी
अवघड वाटणारे प्रश्न शेवटी सोडवा
वर्षभर अभ्यास केला असल्याने विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आणि कोणताही ताण न घेता पेपर सोडवावेत. आता उरलेल्या दिवसांत सराव प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडविण्यावर भर द्यावा. आपटे प्रशालेत शिष्यवृत्तीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास शिबिराचे आयोजन केले होते. यात तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याशिवाय शाळेमध्ये दर शनिवार-रविवारी शिष्यवृत्तीचा वर्ग, सराव परीक्षा घेण्यात आली.
- मेधा सिन्नरकर, प्राचार्या, लक्ष्मणराव आपटे प्रशाला