
Raigad: सिडकोच्या योजनेतील भूखंड हडप
नवी मुंबई - उरण भागात राहणाऱ्या बानू अफलातून अताई (८९) या ३० वर्षांपासून कॅनडा येथे मुलीकडे वास्तव्यास आहेत. या संधीचा फायदा घेत एका टोळीने बानू अताई यांच्या जागी तोतया महिलेला उभे करून सिडकोच्या साडेबारा टक्के योजनेतील ३५० चौरस मीटरचा भूखंड परस्पर हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
विशेष म्हणजे या टोळीने हडप केलेल्या भूखंडावर बांधकाम व्यावसायिकाने इमारतीचे बांधकामही सुरू केले आहे. उरण पोलिसांनी भूखंड हडप प्रकरणात सात जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार खोडायार अफलातुन अताई उर्फ इरानी (७०) हे मूळचे उरण येथील रहिवासी असून सध्या मुंबईतील दादर येथे राहण्यास आहेत. खोडायार अताई यांचा अविवाहित असलेला लहान भाऊ फारुख अफलातुन अताई उर्फ इरानी हा उरणमध्येच राहण्यास आहे.
तर त्यांच्या दोन्ही विवाहित बहिणी व आई बानू अफलातून अताई या ३० वर्षांपासून कॅनडामध्ये राहतात. तेव्हापासून बानू अताई भारतात आलेल्या नाहीत.
त्यामुळे बानू आतई व त्यांच्या दोन्ही मुलींनी उरणमधील वडिलोपार्जित मालमत्तेच्या देखरेखीसाठी खोडायार अताई यांच्या नावाने कुलमुखत्यार पत्र बनविले आहे. तर खोडायार अताई यांनी सदर मालमत्तेच्या देखरेखीसाठी अतुल सुरवाडे यांना ठेवले आहे.
बानू अफलातून अताई यांच्या नावे उरणमधील कोर्ट नाका येथील मौजे काळाधोंडा येथे ३९ गुंठे जमीन असून सिडकोने ही जागा डिसेंबर १९८९ मध्ये संपादित केली आहे. मात्र सिडकोकडून अताई कुटुंबीयांना जमिनीचा साडेबारा टक्के योजनेअंतर्गत लाभ मिळाला नव्हता.
त्यामुळे वर्षभरापूर्वी खोडायार यांनी अतुल सुरवाडे यांच्या माध्यमातून सिडकोकडून साडेबारा टक्के योजनेतील भूखंड मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.
दरम्यान सिडकोच्या वतीने ऑगस्ट २००७ मध्येच बानू अताई यांना द्रोणागिरी सेक्टर-५४ ए मध्ये ३५० चौरस मीटरचा क्र. १२ हा भूखंड वितरित केल्याचे तसेच या भूखंडाचा त्रिपक्षीय करारनामा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
खोडायार अताइ यांनी या व्यवहारातील कागदपत्रांची तपासणी केली असता, त्यांची आई बानू अफलातुन अताई यांच्या जागी तोतया महिलेला उभे करून भूखंड हडप करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले.
तसेच सिडकोकडून वितरित करण्यात आलेल्या द्रोणागिरी सेक्टर-५४ ए मधील भूखंडावर बांधकाम व्यावसायिकाने इमारतीच्या बांधकामाला सुरुवात केल्याची देखील त्यांना माहिती मिळाली. त्यानंतर खोडायार अताई यांनी ही माहिती कॅनडा येथे राहण्यास असलेल्या आईला व बहिणीला दिली. त्यानंतर त्यांनी उरण पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
उरण पोलिसांनी भूखंड हडप प्रकरणात बानू अफलातुन अताई हिचे नाव धारण केलेली बनावट महिला, भूखंडाचा भाडेपट्टा करारनामा करताना ओळख म्हणून सही करणारा फारुख अताई, सागर वाणी, तुषार रसाळ,
त्याचप्रमाणे महिलेचे बनावट ओळखपत्र बनवून देणारे नोटरी ए.आय.मुल्ला, मे.डि.एल.एंटरप्रायझेसचे परवेज अख्तर इब्दुल खालीफ अन्सारी या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
असा हडप केला भूखंड
भूखंड हडप प्रकरणातील टोळीने मूळ जमीन मालक असलेल्या बाणच अफलातुन अताई यांच्या जागी एका बनावट महिलेला सिडकोमध्ये उभे करून कागदपत्रांवर त्या महिलेचे फोटो लावला. त्याद्वारे सिडकोकडून साडेबारा टक्के योजनेतील द्रोणागिरी,
सेक्टर-५४ ए मधील ३५० चौ.मीटरचा भूखंड मिळविला. त्यानंतर टोळीने पनवेल येथील दुय्यम निबंधक कार्यालयातही तोतया महिलेला उभे करून भूखंडाचा भाडेपट्टा करारनामा केला.
तसेच सिडकोकडून वाटप झालेल्या सदर भूखंडाचा त्रिपक्षीय करारनामा करून संबंधित भूखंड मे.डि.एल.एंटरप्रायजेसच्या वतीने प्रो.परवेज अख्तर इब्दुल खालीफ अन्सारी व स्काय ट्विकल तर्फे विकासक भावेश पेटल व दिनकर गुंजाळ यांना विकसित करण्यासाठी दिल्याचे आढळले.