
Mumbai Rain Updates : कल्याण-डोंबिवलीला पावसाने झोडपलं; रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत
डोंबिवलीः कल्याण-डोंबिवली परिसरात बुधवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक सखल भागात पाणी साचले आहे. सकाळी उन्हाचा कडाका असताना सायंकाळी 5 च्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसास सुरवात झाली. अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाल्याचे पहायला मिळाले.
कल्याण, डोंबिवली तसेच ग्रामीण भागात बुधवारी सायंकाळनंतर पावसास सुरुवात झाली. सोसाट्याच्या वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाल्याने पावसाने दाणादाण उडवून दिली.
डोंबिवली स्टेशन परिसरात सुरवातीला पाणी साचले 6 च्या नंतर पावसाचा जोर कमी झाल्याने या पाण्याचा निचरा झाला. तसेच केळकर रोड, डोंबिवली पश्चिमेला रेतीबंदर रोड परिसर, तर कल्याणमध्ये शिवाजी चौक ते मार्केट जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना, वाहन चालकांना या पाण्यातून प्रवास करावा लागला.
रस्त्या शेजारी असलेल्या नाल्यांमधून पाण्याचा निचरा होत नसल्याने सर्व पाणी रस्त्यावर आले. तर कल्याण पूर्वेतील कचोरे येथील भागात देखील पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
गुरुवारी अनंत चतुर्दशी असल्याने नागरिक, सार्वजनिक मंडळ आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची तयारी करत आहेत. ही तयारी सुरू असतानाच पावसाचे देखील दमदार आगमन झाल्याने नागरिकांची पुरती तारांबळ उडाली आहे. तसेच कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे देखील हाल झाले.