मुंबईची 'धूळ'धाण, भर रस्त्यावर होतंय विषारी पदार्थांचे उत्सर्जन

मुंबईची 'धूळ'धाण, भर रस्त्यावर होतंय विषारी पदार्थांचे उत्सर्जन

मुंबई:  मुंबईतील 'रोड डस्ट' म्हणजेच धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून शहरात 71 टक्के पार्टीक्युलेट मॅटर (पीएम) चे प्रमाण नोंदवण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे मेट्रोच्या अपूर्ण कामामुळे निर्माण होणाऱ्या धुळीचे प्रमाण 3.16 टक्के आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच निरीने केलेल्या 'इमिशन इन्व्हेंटरी अँड सोर्स अपोर्शनमेंट स्टडी फॉर मुंबई' या अहवालात हा निष्कर्ष नमूद करण्यात आला आहे. 

अहवालानुसार 2010 मध्ये मुंबईतील निर्माण होणाऱ्या धुळीमध्ये पीएमचे प्रमाण केवळ 29 टक्के होते. त्यात वाढ होऊन ते आता 71 टक्क्यांवर पोहोचले आहे. मुंबईतील अपूर्ण रस्त्यांची कामे, रस्त्यांवर बसवण्यात आलेले पेव्हरब्लॉक यामुळे मुंबईत धुळीचे प्रमाण वाढले आहे. 

धुळीमध्ये मायक्रोस्कोपीक सॉलिड तसेच लिक्विड ड्रॉपलेट्सचे प्रमाण अधिक असल्याने माणसाच्या फुफुसावर दूरगामी परिणाम असून त्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवल्या आहेत. शिवाय श्वसनमार्गाची जळजळ, खोकला, श्वास घेण्यात अडचण आणि क्रॉनिक ब्राँकायटिसचा विकार यासारख्या श्वसन लक्षणे ही वाढले आहेत. निरीने हा अहवाल नुकताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सुपूर्द केला आहे.

मुंबईतील निर्माणधीन बांधकामे हे धुळीचे दुसरे प्रमुख कारण आहे. बांधकामामुळे देखील मोठ्या प्रमाणात धूळ होत असल्याचे समोर आले असून त्याचे काहीसे प्रमाण मात्र कमी होऊन 8 टक्क्यांवर आले आहे. 2010 मध्ये हे प्रमाण 8.54 टक्के इतके होते. इमारती तसेच रस्त्यांच्या बांधकामामुळे हवेचे प्रदूषण 3.16 टक्क्यांनी वाढले आहे.

खराब आणि निकृष्ट दर्जाचे रस्ते हे प्रदूषण तसेच धूळ वाढवण्यास कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुंबईतील प्रदुषणासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असल्या तरी खराब रस्ते, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी या प्रदूषणात अधिक भर घालत असल्याचे 'मुंबई बेस एअर क्वालिटी रिसरचर रेस्पायरर लिविंग सायन्स प्रायव्हेट लिमिटेड'चे संस्थापक अध्यक्ष रौनक सुतारीया यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमा अंतर्गत 2 हजार किलोमीटर रस्ते दररोज स्वच्छ करणे, त्याचे विस्तारीकरण तसेच हिरवळ लागवड करणे यावर भर देण्यात येत आहे. शिवाय इमारतींवर टेरेस गार्डन तयार करणे,वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवून मुंबईतील हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी ही प्रयत्न सुरू आहेत. 

प्रदूषित हवा तसेच पीएमचा आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो. याचा कुणी अभ्यास करत नाही. मात्र कोणत्याही माध्यमातून आलेला पीएम हा आरोग्यासाठी वाईटच असतो. रस्त्यावरील धुळीकणामधून सिलिका, आयन, मॅग्नेशियम तसेच डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमधून निघणारे इतर धातू, हायड्रोकार्बनस आणि निकेल सारखे विषारी पदार्थाचे उत्सर्जन होत असते. हे आरोग्यासाठी अतिशय घटक असल्याचे पलमोकेअर रिसर्च अँड येड्यूकेशन फाउंडेशनचे संचालक डॉ संदीप साळवे यांनी सांगितले. 

डिझेलवरील कारमुळे 0.10 टक्के पीएम तर पेट्रोल वरील कारमुळे 0.02 टक्के पीएम उत्सर्जन होते.  तर अवजड वाहनांमुळे 3.32 टक्के पीएम उत्सर्जन होते. 2010 च्या तुलनेत हे प्रमाण घटले असून 2010 मध्ये त्याचे प्रमाण हे 3.42 टक्के होते. यासह बेकरी 3.52 , हॉटेल/रेस्टोरंट 1.28 , स्मशानभूमी 0.61 टक्के प्रमाण आहे. तर खुल्या जागा किंवा डोंगरांना लागणाऱ्या आगीमुळे उत्पन्न होणाऱ्या पीएम मध्ये घट होत हे प्रमाण 10.84 वरून 3.69 पर्यंत कमी झाले आहे. 

मुंबईतील देवनार क्षेपणभूमी ही एकमात्र मोठी आणि खुली क्षेपणभूमी असून तेथे दिवसाला 1,300 मेट्रिक टन कचरा कोणत्याही प्रकारची शास्त्रीय प्रक्रिया न करता टाकला जातो. या ठिकाणी मुंबईतील तीन मोठ्या रासायनिक कारखान्यांचा कचरा टाकला जात असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. मुलुंड येथी 24 हेक्टर परिसरात पसरलेली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी क्षेपणभूमी 2018 मध्ये बंद करण्यात आली. कांजूरमार्ग येथील क्षेपणभूमीचा वापर हा दैनंदिन 5 हजार जैविक आणि रासायनिक वर्गीकरण केलेल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी केला जातो. 

मुंबईतून दिवसाला 6 ते 7 हजार मेट्रिक कचरा निर्माण होतो. इतक्या मोठ्या प्रमाणात निघणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे किंवा त्यावर पुनर्वापर करणे शक्य नाही असे 'निरी'चे संचालक राकेश कुमार यांनी हवा प्रदूषणावरील बैठकीत सांगितले. 

या बैठकीचे आयोजन परपोज,असर आणि क्लायमेट ट्रेंड यांनी महाराष्ट्र पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या माझी वसुंधरा प्रकल्पाच्या मदतीने केले होते. “धुळीचे वाढते प्रमाण यामुळे हवेतील पीएम वाढवणारे आहे.हे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच त्यावरील उपाययोजना सुचविण्यासाठी 'निरी'ने शहरातील 20 ठिकाणी रेडी-मिक्स-कॉंक्रिटच्या प्रकल्पांचा अभ्यास व ऑडिट केले आहे असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव यांनी सांगितले. 
 
वाहन प्रकार     पीएम

डिझेल कार      0.10 % 
पेट्रोल  कार      0.02 %
अवजड वाहने  3.32 %
बेकरी              3.52 %
हॉटेल/रेस्टोरंट  1.28 % 
स्मशानभूमी      0.61 %.
आग               3.69 %

 
धुळीमधील सिलिका,आयन,मॅग्नेशियम तर डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमधून निघणारे धातू,हायड्रोकार्बनस आरोग्यासाठी ठरतंय घातक
 
मुंबईत श्वसनमार्गाची जळजळ, खोकला, श्वास घेण्यात अडचण आणि क्रॉनिक ब्राँकायटिसचा त्रास वाढला.
-----------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai Road dust responsible 71 per cent NEERI Study

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com