Mumbai : शाळकरी मुलांनी सहा तासांत बनविले गड किल्ले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai School students made diwali forts

Mumbai : शाळकरी मुलांनी सहा तासांत बनविले गड किल्ले

डोंबिवली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गड किल्ल्यांचे महत्व आणि त्यांचे संवर्धन का आवश्यक आहे ? याची जाणीव शाळकरी मुलांना व्हावी या हेतूने डोंबिवली मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि जाणता राजा युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने गड किल्ल्यांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यामध्ये शाळकरी मुलांनी अवघ्या 6 तासांत 12 हून अधिक किल्ल्यांची प्रतिकृती साकारली आहे. हे प्रदर्शन पाहण्यास सध्या नागरिक गर्दी करत आहेत.

डोंबिवली पश्चिमेतील गावदेवी मंदिर जवळील मैदानात आंतर शालेय किल्ले बांधणी स्पर्धा आणि प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विनोद पाटील, प्रकाश भोईर,

माजी नगरसेविका सरोज भोईर, शहर सचिव संदीप म्हात्रे, अरुण जांभळे यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. मुलांनी गड किल्ल्यांच्या साकारलेल्या प्रतिकृती पाहून आमदार पाटील यांनी या मुलांसाठी रायगडावर सहल आयोजित केली जाईल असे जाहीर आश्वासन मुलांना दिले.

शिवकाळात गड आणि किल्ल्यांचे महत्व किती होते, स्वराज्याची स्थापना करण्यात शिवाजी महाराजांना गड-किल्ल्यांची कशी मदत झाली, या गड-किल्ल्यांचे संवर्धन का आवश्यक आहे, ही सर्व माहिती आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी हे किल्ले पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

शाळकरी मुलांना पर्यावरण पूरक किल्ले बांधणी हा विषय देण्यात आला होता. यामुळे माती, दगड, चिकणमाती, विटा, गोणपाट व रांगोळीच्या माध्यमातून मुलांनी आकर्षक असे गड किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या आहेत.

8 ते 10 वी चे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. टिळकनगर विद्यामंदिरचे ज्ञानेश्वर गलांडे, सोहम शेळके व सूरज सावंत यांनी 6 तासात सिंहगड कोंढाणा हा किल्ला साकारला आहे. याआधी ही आम्ही अशा स्पर्धांत सहभाग घेतला आहे. महाराजांच्या काळातील गड किल्ले, त्यातील बारकावे साकारताना त्या इतिहासाची जाणीव होते असे यावेळी या मुलांनी सांगितले.

या प्रदर्शनात रायगड, प्रतापगड, तोरणा, विसापूर, हडसर, पुरंदर, वासोटा, लोहगड, सिंहगड कोंढाणा अश्या विविध 15 किल्ल्याची प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत. तसेच शिवकालीन नाणी, पत्र सुद्धा इथे पहावयास मिळतात.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास हा जागृत रहावा तसेच गड किल्यांची माहिती ही सर्वांपर्यंत पोहचावी यासाठी शिवकालीन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे मनसेचे माजी नगरसेवक तथा जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी सांगितले.