महिलांविरोधात गुन्ह्यांमध्ये मुंबई शहर देशात दुसऱ्या स्थानावर

अनिश पाटील
Wednesday, 30 September 2020

 महिलाविरोधात गुन्ह्यांचा विचार केल्यास दिल्लीपाठोपाठ मुंबईत सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग(एनसीआरबी) देशातील 19 मोठ्या शहरांमध्ये याबाबत मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मुंबई:  महिलाविरोधात गुन्ह्यांचा विचार केल्यास दिल्लीपाठोपाठ मुंबईत सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग(एनसीआरबी) देशातील 19 मोठ्या शहरांमध्ये याबाबत मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे सार्वजनिक वाहतुकीदरम्यान सर्वाधिक विनयभंग मुंबईत घडले आहेत.

एनसीआरबी, 2019 च्या आकडेवारीनुसार, दिल्लीपाठोपाठ मुंबईतील सर्वाधिक म्हणजे सहा हजार 519 महिलांविरोधातील गुन्हे दाखल झाले आहेत. याच काळात दिल्लीत 12 हजार 902 महिलांविरोधातील गुन्हे दाखल झाले होते. पण गुन्ह्यांच्या वाढत्या दराचा विचार केल्यास मुंबईत देशात नवव्या क्रमांकावर आहे. मुंबईत महिलांविरोधात गुन्हे वाढीचा दर 76.5 आहे. त्याच्या तुलनेत जयपूरमध्ये(235), लखनऊ(175.4), दिल्ली(170.3), इंदोर(169.1), पटना(102.3), कानपूर(98.5), नागपूर (93.6), तर बंगळूरू(85.9) इतके टक्के गुन्ह्यांची नोंद आहे. 

बलात्काराच्या गुन्ह्यांचा विचार केला, तर मुंबई देशात तिस-या क्रमांकावर आहे. देशात अनुक्रमे दिल्ली (1231), जयपूर(517) आणि मुंबई (394) या तीन शहरांमध्ये सर्वाधिक बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. विनयभंगाच्या बाबतीतही मुंबई देशात दुस-या क्रमांकावर आहे. मुंबईत 2019 मध्ये 2069 विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले होते. याबाबतीतही दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. दिल्लीत 2019 मध्ये दोन हजार 326 विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले होते. त्यात लैंगिक अत्याचार, पाठलाग करणे, जबरदस्ती करणे आदी प्रकरणांचा समावेश आहे.

सार्वजनिक वाहतुकीचे सर्वाधिक मोठे जाळे असलेल्या मुंबईत सार्वजनिक वाहतुकीदरम्यान सर्वाधिक म्हणजे 16 लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. त्या पाठोपाठ पुणे, दिल्ली आणि हैद्राबाद यांचा क्रमांक आहे. याशिवाय भादंवि कलम 509(महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे बोलणे अथवा वस्तू प्रदर्शीत करणे) अंतर्गत विनयभंगाचे प्रकारही मुंबईत सर्वाधिक आहेत. याबाबत मुंबईत 575 गुन्हे दाखल झाले होते, त्या पाठोपाठ दिल्ली 456 गुन्ह्यांनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय मानव तस्करीचीही सर्वाधिक प्रकरणं मुंबईत घडली आहेत. त्यात 85 गुन्ह्यांमध्ये 401 पीडितांचा समावेश आहे, दिल्लीत 56 गुन्ह्यांमध्ये 388 पीडितांचा समावेश होता.

मुलांविरोधातील गुन्हे दाखल करण्यातही दिल्ली आणि मुंबई आघाडीवर आहेत. बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा(पोक्सो) अंतर्गत मुंबईत 1319 गुन्हे दाखल झाले होते, त्यात 1431 पीडित मुलांचा समावेश आहे, दिल्ली याबाबत पहिल्या क्रमांकावर असून दिल्लीत 1662 गुन्ह्यांमध्ये 1674 पीडित मुलांचा समावेश होता. मुलांविरोधातील इतर गुन्ह्यांमध्येही दोन शहरे देशात आघाडीवर आहेत. दिल्लीत 7565 गुन्हे, तर मुंबईत 3640 गुन्हे दाखल झाले आहेत.

महिलाविरोधात गुन्हे प्रलंबित असण्याबाबतही मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईत महिलांविरोधातील 67.2 टक्के गुन्हे प्रलंबित आहेत, तर चेन्नई याबाबत पहिल्या क्रमांकावर आहे. चेन्नईत 81.9 गुन्हे प्रलंबित आहेत. लहान मुलांविरोधात प्रलंबित गुन्ह्यांबाबतही चेन्नई पाठोपाठ मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

---------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Mumbai is second in the India country in crimes against women


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai is second in the India country in crimes against women