Mumbai : मध्यवर्ती शाखा आमने सामने डोंबिवलीत ठाकरे गटाची नविन शिवसेना शाखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाकरे गट

Mumbai : मध्यवर्ती शाखा आमने सामने डोंबिवलीत ठाकरे गटाची नविन शिवसेना शाखा

डोंबिवली : डोंबिवलीत शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेचा शिंदे गटाने कायदेशीर ताबा घेतला. यानंतर हार न मानता ठाकरे गटाने शाखेपासून हाकेच्या अंतरावरच रस्त्याच्या त्या बाजूने आपली नविन शाखा सुरु केली आहे. सेनेतील दुफळीनंतर डोंबिवलीत शिंदे गटाचे कार्यकर्ते केवळ आमने सामने आल्याचे पहायला मिळत असताना आता शाखा देखील आमने सामने उभ्या ठाकल्या आहेत. गेल्या दोन तीन दशकांपासून मध्यवर्ती शाखेतून नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडली जात होती. आता याच शाखांचे विभाजन झाल्याने डोंबिवलीकर कोणाकडे दाद मागायला जातात हे आता येणारा काळच ठरवेल.

कल्याण डोंबिवली शिवसेनेचा बालेकिल्ला असून कल्याण लोकसभा मतदार संघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा आहे. याच मतदार संघात असलेल्या डोंबिवलीच्या शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेवर ताबा मिळविण्यासाठी ठाकरे व शिंदे गटात जोरदार राडेबाजी झाली होती. ठाकरे गटाच्या अवघ्या काही सदस्यांनी शिंदे गटाला अडविल्याने शिंदे गटाचा अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर शिंदे गटाने कायदेशीर रित्या जात ही शाखा ताब्यात घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नुकताच डोंबिवलीत दौरा झाला होता. यावेळी त्यांनी या शाखेला भेट दिल्यानंतर त्याचे पुत्र तथा खासदार शिंदे यांना आपले अश्रु अनावर झाल्याचे पहायला मिळाले होते.

मध्यवर्ती शाखेवर शिंदे गटाने ताबा मिळविल्यानंतर ठाकरे गटाच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला. अखेर डोंबिवली स्टेशन परिसरात मध्यवर्ती शाखेपासून हाकेच्या अंतरावरच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने जुनी ढापरे बिल्डिंगमध्ये आपली नवीन शाखा सुरु केली आहे. गेल्या दोन तीन दशकांपासून जुन्या मध्यवर्ती शाखेतून शिवसैनिक आपले कामकाज चालवत होते. आता ठाकरे गटाने आपला संसार नविन कार्यालयात हलविला आहे. शनिवारी ठाकरे गटाकडून नविन शिवसेना शाखा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या शाखेतून नव्या जोमाने काम करुन येत्या काळात यश संपादन करु असा विश्वास यावेळी डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर यांनी बोलून दाखविला.

ते म्हणाले, निश्चित गेले 30 वर्षे आम्ही मध्यवर्ती शाखा कार्यालयातून काम करत होतो. मात्र ती शाखा शिंदे गटाने ताब्यात घेतली, याचे आम्हाला वाईट वाटले. मध्यवर्ती शाखा त्यांनी ताब्यात घेतली तरी आमचे काम काही ते थांबवू शकलेले नाहीत. आजही अनेक शिवसैनिक शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत असून जे गेले त्यांच्याबद्दल आता आम्हाला बोलायचे नाही. पुन्हा नव्या जोमाने आम्ही कामाला सुरुवात केली असून येणाऱ्या काळात आम्ही यश नक्कीच मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.