Mumbai : आत्महत्या प्रकरणात भाजप कार्यकर्ते संदीप माळी यांना गुंतविले जातेय भाजपाचे स्पष्टीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bjp

Mumbai : आत्महत्या प्रकरणात भाजप कार्यकर्ते संदीप माळी यांना गुंतविले जातेय

डोंबिवली : संदप येथील एका केबल व्यावसायिकाने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. इतर केबल व्यावसायिकांसोबत असलेली स्पर्धा आणि छळ याला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचा व्हिडीओ मयत प्रल्हाद पाटील यांनी केला होता. यात त्यांनी भाजपा कार्यकर्ते संदीप माळी यांचे नाव त्यांनी घेतले होते. यावर आत्महत्या प्रकरणात भाजपा कार्यकर्त्याच्या काही संबंध नाही. माळी यांचे नाव यात गुंतविले जात आहे. या प्रकरणाचा चारी बाजूंनी तपास व्हावा अशी मागणी कल्याण भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून दबावतंत्रचे राजकारण केलं जात असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

डोंबिवली जवळील संदप गावात राहणारे प्रल्हाद पाटील यांनी आत्महत्या केली असून त्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ बनविला आहे. व्यवसायात त्यांना त्रास दिला जात आहे असे म्हणत त्यांनी काही लोकांची नावे त्यात घेतली आहेत. याप्रकरणी भाजप कार्यकर्ते संदीप माळी यांच्यासह 15 जणा विरोधात ठाणे जिआरपी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे, माजी आमदार व जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या शिष्टमंडळाने डीसीपी सचिन गुंजाळ यांची भेट घेत संदीप माळी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.

भाजपच्या नेत्यांचे संदीप माळी यांना पाठबळ असल्याचा देखील आरोप तपासे यांनी केला होता. त्यानंतर भाजपाने राष्ट्रवादी विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. शनिवारी पत्रकार परिषद घेत भाजपा कार्यकर्त्याला यात गुंतविले जात असल्याचा आरोप भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, नंदू परब, नंदू जोशी, अमर माळी,

रविना माळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे म्हणाले, संदीप माळी यांचा त्या प्रकरणात काही संबंध नाही. राजकीय षडयंत्रातूनच त्याचं नाव या प्रकरणात गोवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करत दोषींवर कठोर कारवाई करावी. राष्ट्रवादीकडून जे आंदोलन केले जाते ते राजकीय हेतूपोटी केली जातात. राष्ट्रवादीने देखील एखाद आंदोलन करण्यापूर्वी या प्रकरणाची चौकशी करावी. पोलिसांनी या प्रकरणात निपक्ष चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून दबावतंत्र चे राजकारण केलं जातंय, मुळात स्वतः चौकशी करा नाहक भाजपच्या पदाधिकाऱ्याला बदनाम करु नका अशी टिका त्यांनी राष्ट्वादी काँग्रेस वर केली. उगाच कोणत्या व्यक्ती पार्टी आणि परिवाराला नाहक बदनाम करू नये. राजकीय भांडवल करू नये असा इशारा कांबळे यांनी यावेळी दिला.