esakal | मुंबईत स्वाईन फ्लू ! सहा वाॅर्डात धोका वाढतोय
sakal

बोलून बातमी शोधा

Swain Flu

मुंबईत स्वाईन फ्लू ! सहा वाॅर्डात धोका वाढतोय

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईत पावसाळी आजारांचे (Monsoon Decease) प्रमाण वाढत आहे. मात्र, त्यासोबत सर्वाधिक स्वाईन फ्लूचा (Swain Flu) धोका वाढत असल्याचे पालिकेने दिलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. मुंबईत (Mumbai) गेल्या सहा महिन्यांत 11 जुलैपर्यंत स्वाईन फ्लूच्या 19 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, फक्त एकट्या जुलै महिन्यात 12 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई महापालिकेच्या (BMC) आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात आढळलेले 12 स्वाईन फ्लूचे रुग्ण हे डी, जी दक्षिण, के पूर्व , के पश्चिम, पी दक्षिण आणि टी वॉर्डमध्ये सापडले आहेत. म्हणजेच आतापर्यंत या वॉर्डमधून सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. (Mumbai Swain Flue patients found BMC report says-nss91)

स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलेनत वाढ झाली आहे. जुलै 2020 मध्ये एकाही स्वाईन फ्लूच्या रुग्णाची नोंद झाली नव्हती. पण, 11 जुलै 2021 पर्यंत एकाच महिन्यात 12 रुग्णांची नोंद झाली असून सहा महिन्यात एकूण 19 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, गेल्या वर्षभरात एकूण 44 स्वाईन फ्लूच्या रुग्णांची नोंद झाली होती. तर, एकाचाही मृत्यू झालेला नव्हता. यावर्षी रुग्णसंख्या जरी वाढत असली तरी एकाही मृत्यूची नोंद अद्याप करण्यात आलेली नाही असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: सचिनने रक्तदान शिबीर आयोजित करुन घालून दिला धडा

स्वाईन फ्लूची आकडेवारी

2019 - 451

2020 - 44

2021 (जुलै) - 19

स्वाइन फ्लूची लक्षणे -

एच1एन1 ची लक्षणे ही बरीचशी साध्या तापासारखीच असतात. त्यामुळे दोघांमधला फरक लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

तीनपेक्षा जास्त दिवस भरपूर ताप येणे

बरी न होणारी सर्दी व खोकला

खोकताना रक्त पडणे

श्वसनास त्रास होणे

मळमळणे आणि उलट्या होणे

नाक गळणे

अशक्तपणा आणि थकवा

प्रतिबंधात्मक उपाय:

- भरपूर पाणी प्या

- गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा

- प्रवास करताना एन 95 मास्क वापरा (मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध)

- प्रथिनांनी समृद्ध आहार घ्या

कसा पसरतो हा आजार

एच1एन1 या नावानेही ओळखला जाणारा स्वाइन फ्लू म्हणजे अनेक प्रकारच्या स्वाइन इन्फ्लुएन्झा विषाणूंमुळे होणा-या संसर्गातून होणारा आजार आहे. हा अतिशय वेगाने फैलावणारा आजार असून एच1एन1 विषाणूने बाधित व्यक्तीच्या अगदी कमीत-कमी संपर्कामुळेही तो पसरू शकतो. जेव्हा बाधित व्यक्ती खोकते, थुंकते किंवा शिंकते तेव्हा विषाणूंचे अतिसूक्ष्म थेंब हवेत फवारले जातात. हे थेंब लिफ्टचे बटन, डोअरनॉब्ज, फ्लश नॉब्ज असे जिथे-जिथे पडतात त्या जागेला स्पर्श केल्यास एच1एन1 स्वाइन फ्लूची बाधा होऊ शकते.

loading image