Mumbai : थर्टी फास्टच्या पार्श्वभूमीवर 16 महिला पोलिसांचे विशेष पथक तैनात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Women Police Centre

Mumbai : थर्टी फास्टच्या पार्श्वभूमीवर 16 महिला पोलिसांचे विशेष पथक तैनात

डोंबिवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीनंतर यावर्षी नववर्षाचे जल्लोषात आणि उत्साहात स्वागत करण्यासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. रात्री उशिरा चालणाऱ्या पार्ट्या तसेच महिलांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कल्याण डोंबिवलीतील पोलिस यंत्रणा देखील सज्ज झाली असून यंदा 16 महिला पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे.

त्यासोबतच 150 पोलीस अधिकारी व 900 कर्मचारी यांचा बंदोबस्त लावला गेला असून नाकाबंदी करत ते पहारा देतील. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेतली जाईल अशी माहिती कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली.

कोरोनामुळे गेले दोन वर्षे नागरिकांना सण उत्सव उत्साहात साजरे करता आले नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव संपताच व जनजीवन सुरळीत सुरू झाल्याने यावर्षी सगळे सण उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरे झाले आहेत. त्याच उत्साहात सरत्या वर्षाला निरोप देत नव वर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाणार आहे. 31 डिसेंबर च्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी आराखडा तयार केला असून त्याची अंमलबजावणी देखील करण्यात येत आहे. यात शांतता कमिटी व हॉटेल व्यावसायिकांशी संपर्क साधून बैठका घेण्यात आल्या आहेत. थर्टीफर्स्ट शांततेच्या मार्गाने कसा साजरा करता येईल याबाबत सविस्तर निर्देश देण्यात आले आहेत.

याविषयी पोलीस उपायुक्त गुंजाळ म्हणाले, कोरोनानंतर आता यावर्षी मोठमोठ्या आस्थापनांनी हॉटेल, हॉल अशा सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याठिकाणी महिलांची सुरक्षितता महत्वाची असून त्यासाठी प्रत्येकी 8 पोलीस ठाण्यात 2 महिला असे एकूण 16 महिलांचे पथक तैनात करण्यात आले आहे. सार्वजनिक व खासगी ठिकाणी महिलांची छेडछाड होऊ नये यासाठी हे महिला पोलीस गस्त घालत लक्ष ठेवतील. घातपाताचा प्रकार होऊ नये यासाठी सीसीटीव्ही द्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. कल्याण परिमंडळ 3 मधील जवळजवळ 150 अधिकारी आणि 900 कर्मचारी हे सर्व रस्त्यावर जागोजागी गस्त घालतील.

शहरात येणारे आणि शहरातून बाहेर जाणाऱ्या मार्गांवर प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी लावली जाईल. नाकाबंदीच्या ठिकाणी ब्रेथ अनलिसस ठेवले जातील

आणि ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस या मोठ्या प्रमाणावर केल्या जातील. त्याचबरोबर हॉटेल, रिसॉर्ट मध्ये पार्टीचे आयोजन केले आहे त्याठिकाणी केडीएमसी अधिकारी यांच्यासोबत एक पथक तयार करून कोरोनाच्या अनुषंगाने नियमांचे पालन होते की नाही याची तपासणी केली जाईल असे पोलीस उपायुक्त गुंजाळ यांनी सांगितले.

नववर्षाचे उत्साहात स्वागत करताना कोणताही अनुचित प्रकार घडला किंवा पोलिसांच्या मदतीची आवश्यकता लागली तर नागरिकांनी केंद्र शासनाच्या 112 या हेल्पलाईन क्रमांकावर तत्काळ संपर्क साधावा. तक्रार दिल्यानंतर अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये बीट मार्शल अथवा गस्तीवर असलेले पोलीस त्याठिकाणी पोहोचून नागरिकांना मदत करतील. आपली सुरक्षितता आणि नियमांचे पालन करून नववर्षाचे स्वागत सर्वांनी करावे असे आवाहन यावेळी पोलीस उपायुक्त गुंजाळ यांनी नागरिकांना केले आहे.