
Mumbai : ठाकरे गटाचे निलेश पराडकर टिळक नगर पोलिसांकडून अटक
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन सध्या तुरुंगवास भोगत असला तरी त्याचा शिष्याने मुंबईत वाढदिवस साजरा केल्याची घटना घडली होती. छोटा राजनच्या साथीदारांनी त्याचा वाढदिवस साजरा करत केक कापला होता. या प्रकरणी ठाकरे गटाचे नवी मुंबईचे संपर्कप्रमुख निलेश (आप्पा) पराडकर यांना शनिवारी रात्री उशिरा टिळक नगर पोलिसांनी अटक केली.
कुख्यात गुंड छोटा राजन याच्या वाढदिवसानिमित्त निलेश पराडकर यांनी केक कापला होता. छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्त केक कापल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर निलेश पराडकर यांना टिळक नगर पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला होता. त्यांच्यावर सामाजिक शांतता भंग केल्याप्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
निलेश पराडकर यांना वाढदिवसाचा केक कापल्याप्रकरणी रविवारी दुपारीकोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने काही अटी शर्तीवर पराडकर यांना जामीन मंजूर केला आहे. टिळकनगर पोलीस ठाण्यात हजेरी लावणे पासपोर्ट जमा करणे, तसेच कुठल्याही समाजविघातक कृत्यात सहभागी होऊ नये अशा अटी आणि 25 हजार रुपये जात मुचलक्यावर अंतरिम जामीन देत दिलासा दिला आहे.
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन हा तिहारमध्ये तुरुंगवास भोगत असला तरी, त्याचा वाढदिवस चेंबूरमध्ये ठाकरे गटाचे नवी मुंबईचे संपर्कप्रमुख निलेश पराडकर यांनी त्यांच्या साथीदारांनी 13 जानेवारी रोजी साजरा केला. त्यांनी केकवर बिग बॉस असं लिहिलं होतं. छोटा राजनच्या या शिष्याचं नाव निलेश पराडकर असून ते छोटा राजनसह अनेक प्रकरणात आरोपीदेखील होते.