विद्यापीठ प्रशासनाच्या बेजबाबदार कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका!

विद्यापीठ प्रशासनाच्या बेजबाबदार कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका!

मुंबई : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुंबई विद्यापीठाला अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे दुष्काळग्रस्त परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. कलिना संकुलातील सांस्कृतिक भवनला पालिकेने जलजोडणी दिली नसल्याने प्रशासनाने विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी टॅंकरची मदत घेतली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी बाटलीबंद तर वापरासाठी टॅंकरच्या पाण्यावर या विभागाला अवलंबून राहवे लागत असल्याने यावर महिन्याला 50 ते 60 हजारांचा र्भुदंड सहन करावा लागत आहे. सांस्कृतिक भवनच्या इमारतीचे बांधकाम पाच ते सहा वर्षांपुर्वी पूर्ण झाले असतानाही तिची अवस्था खराब बनली आहे. 

मुंबई विद्यापीठाने कलिना संकुलाच्या गेटसमोर एका पंचतारांकित हॉटेलजवळ पाच वर्षांपुर्वी इमारत उभारली. सध्या या इमारतीचे अधिकृतरित्या नामकरण झाले नसल्याने इमारतीला सांस्कृतिक भवन म्हटले जाते. महापालिकेने भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) न दिल्याने इमारतीला पाण्याची सुविधा अद्यापही मिळू शकलेली नाही. असे असतानाही प्रशासनाने या इमारतीमध्ये नाट्यशास्त्र विभाग, संगीत विभाग आणि लोककला विभाग स्थलांतरित केले. विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी टॅंकरमार्फत पाणीपुरवठा सुरू आहे. तर पिण्याच्या पाण्यासाठी बाटलीबंद पाणी आणण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणे काम केल्याने अजूनही या इमारतीला महापालिकेकडून जलजोडणी मिळू शकलेली नाही. यामुळे टॅंकर आणि बाटलीबंद पाण्यासाठी विद्यापीठाला दरमहा सुमारे 50 ते 60 हजार रूपये खर्च करावे लागत आहेत. 

कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना सुविधा देण्यासाठी विद्यापीठाकडे निधी नसल्याचे कारण पुढे केले जाते. परंतू अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे सांस्कृतिक भवनाला पाणीपुरवठा करण्यावर आतापर्यंत सुमारे 4 लाख रूपये खर्च झाले आहेत. एका टॅंकरसाठी तीन हजार रूपये खर्च होतात. असे महिन्याला 20 ते 22 टॅंकर पाणी लागते. कर्मचाऱ्यांनी टॅंकर चालकाला फोन केल्याशिवाय टॅंकर येत नाही. त्यामुळे अचानक पाणी संपले की विद्यार्थ्यांना हात, तोंड धुण्यासही पाणी मिळत नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. नुकतीच ही इमारत उभारण्यात आली असली तरी पावसाळ्यात छतामधून पाणी खाली येते. भिंतींना वाळवी लागली आहे. रंगाचे पापुंदरे खाली पडतात. नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांना आवश्‍यक सुविधांचा अभाव आणि इमारतीच्या मलनि:सारण वाहिन्या फुटल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत. विद्यापीठाच्या गेटबाहेर ही इमारत असल्याने जेवनासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा तब्बल अर्धा ते पाउण तास केवळ चालण्यामध्ये खर्ची पडत असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत. 

विद्यापीठाचे कुलगुरूंचे राजकीय पदाधिकाऱ्यांसोबत संबंध असतात. विद्यापीठातील अनेक इमारतींना ओसी नाही. सुविधा नाहीत, त्या मिळविण्यासाठी कुलगुरू राजकीय नेत्यांची मदत का घेत नाहीत. कुलगुरू पद भुषवत असले तरी त्यांना विद्यार्थ्यांचे देणे घेणे नसते. कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लक्ष देणे आवश्‍यक आहे. 
- संजय वैराळ - माजी सिनेट सदस्य 

............ 
सांस्कृतिक भवन इमारतीला पाणीपुरवठा करण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच या विभागाला जलजोडणीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल. 
- शरद राणे - अभियंत्ता मुंबई विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com