
मुंबई : डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता थेट मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रातून दुहेरी पदवीचे शिक्षण घेता येणार आहे. या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रविष्ठ होऊन एकाच वेळी दोन पदव्या घेता येणार आहेत. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थित नुकताच मुंबई विद्यापीठ दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र आणि डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राजनीश कामत आणि कुलसचिव प्रा. विलास पाध्ये उपस्थित होते.