
Mumbai News : नव्या वर्षात 27 गावांना पाण्याच्या अमृत योजनेचा लाभ
डोंबिवली - 27 गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम गावांत सुरू आहे. या योजनेअंतर्गत सुरू असलेल्या जलकुंभांची व टॅपिंग एकसाठीच्या पाईपलाईन च्या कामाची पाहणी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी बुधवारी केली.
टॅप वन मधील कामे एप्रिल मध्ये तर उर्वरित योजनेची कामे डिसेंबर अखेर पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी आयुक्तांनी दिल्या आहेत. यामुळे नव वर्षात 27 गावातील ग्रामस्थांना अमृत योजनेअंतर्गत पाण्याचा लाभ मिळून दिलासा मिळेल.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सन 2015 साली समाविष्ट झालेल्या 27 गावांसाठी पाणी पुरवठा योजनेचे काम केंद्र शासन व राज्य शासन पुरस्कृत अमृत मिशन योजनेअंतर्गत सुरू आहे. ही योजना डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे.
हे लक्ष गाठण्यासाठी योजनेला गतिमानता आणणे व योजनेतील अडथळे दूर करणे तसेच प्रत्यक्ष कामाचा वेग वाढविण्याच्या दृष्टीकोनातून, महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी बुधवारी या योजनेअंतर्गत सुरू असलेल्या गोळवली, दावडी, कोळे, काटई ,संदप,सागाव येथील जलकुंभांची व टॅपिंग एक साठी जोडणी करण्यासाठी सुरू असलेल्या एक हजार मिलिमीटर व्यासाच्या पाईपलाईनच्या कामाची ठेकेदार प्रतिनिधी, प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार - महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली.
या पाहणी दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे शहर अभियंता अर्जुन अहिरे, अमृत योजनेचे कार्यकारी अभियंता शैलेश कुलकर्णी उपस्थित होते. पालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी ठेकेदाराला सुरू असलेल्या सर्व जलकुंभाची कामे एप्रिल 2023 अखेर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
टॅपिंग एकच्या नळ जोडणी चा फायदा 18 गावांना होणार आहे. ती पुढील एक महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण योजना डिसेंबर 2023 अखेर पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदारास प्रत्यक्ष जागेवर केल्या.
त्याप्रमाणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांना ठेकेदाराकडून कामाच्या प्रगतीचा बारचार्ट घेऊन त्याप्रमाणे दर दहा दिवसांनी आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात येईल व प्रगती किती झाली याची पाहणी करण्यात येईल अशा सूचना दिल्या. ही योजना डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांना कालबद्ध पद्धतीने काम करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी या पहाणीदरम्यान दिल्या.