Water Tanker : मुंबईत टॅंकर लॉबीची धंदा तेजीत; १ हजार लिटर पाण्याला मोजावे लागतात...

पाणी पुरवठ्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या वसाहती, उंचावरील वसाहती, भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) नसलेल्या इमारती तसेच झोपडपट्टयांमध्ये पिण्याची पाण्याची टंचाई टॅंकर लॉबी कॅश करू लागली आहे.
Water Tanker
Water Tankersakal
Summary

पाणी पुरवठ्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या वसाहती, उंचावरील वसाहती, भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) नसलेल्या इमारती तसेच झोपडपट्टयांमध्ये पिण्याची पाण्याची टंचाई टॅंकर लॉबी कॅश करू लागली आहे.

मुंबई - पाणी पुरवठ्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या वसाहती, उंचावरील वसाहती, भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) नसलेल्या इमारती तसेच झोपडपट्टयांमध्ये पिण्याची पाण्याची टंचाई टॅंकर लॉबी कॅश करू लागली आहे. त्यामुळे मुंबईच्या अनेक भागात टॅंकर लॉबीची चंगळ सुरू आहे. १ हजार लिटर पाण्याला ५०० ते ७०० रुपये मोजावे लागत असून पालिकेच्या पाण्याची राजरोस विक्री होत आहे.

जलबोगदा फुटल्याने गेल्या महिन्यात सर्व मुंबईत पंधरा टक्के पाणी कपात लागू केल्याने टॅकर लॉबीची सुगी सुरू होती. महिन्याभराच्या काळात पिण्याचे पाणी मिळावे यासाठी शहर आणि उपनगराच्या अनेक भागातील नागरिकांचे जलअभियंता विभागावर मोर्चे धडकत होते. सद्या मुंबईच्या उंचावरील, पाणी पुरवठ्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या भागात, झोपडपट्ट्यात अजूनही पाण्याचा तुटवडा आहे.

मुंबईची तहान भागवण्यासाठी पाण्याची गरज भासत असताना पाणी माफियांचा धंदा तेजीत सुरू आहे. मुंबईतल्या काही झोपडपट्ट्यात, व्यापारी संकुले, खासगी टँकर माफिया तसेच झोपदीदादा पाणी चोरी करीत असल्याची माहिती समोर आली आहे. पाणी गळती, पाणी चोरीमध्ये हजारो लिटर पाणी वाया जात असताना हे रोखण्यासाठी पालिका प्रशासनाला अपयश आल्याचे चित्र आहे.

मुंबईतील चेंबूरच्या एम वॉर्डामधील सुमारे ५० टक्के कुटुंबं दररोज पाणी विकत घेतात. पाण्यावर होणारा खर्च हा जवळपास अन्नधान्यांवर होणाऱ्या खर्चाइतकाच आहे. साडेसहा ते दहा हजार रुपये प्रतिमहिना आर्थिक उत्पन्न असलेल्या या कुटुंबांच्या मिळकतीमधला मोठा हिस्सा हा पाणी विकत घेण्यावर खर्च होतो, असे गोवंडी --शिवाजी नगर, मानखुर्द मधील रहिवासी सांगतात.

सामान्यांच्या असहायतेचा फायदा घेऊन टँकर माफिया पाणी विकतात. ज्यांच्याकडे नळ आहेत त्यामध्येही कमी दाबाने पाणी येते, या नळातूनही पाणी चोरून दुसऱ्या जोडण्या दिल्या जातात. पालिका नव्या जोडण्या देत नसल्याने सामान्यांपुढे पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय नसतो. तर दुसरीकडे काही व्यापारी संकुले, भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेल्या इमारती, झोपडपट्ट्याना टँकरने अनधिकृतपणे पाणी पुरवठा केला जात असल्याचे विदारक चित्र सद्या दिसत आहे.

गळती आणि चोरी थांबेना

एकीकडे पाणी माफिया तर दुसरीकडे पाणी गळतीचे प्रमाणही मोठे आहे. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी दररोज ३,८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो, असा दावा जल विभागाकडून करण्यात येतो. मात्र पाणी चोरी व गळतीमुळे दिवसाला २८ टक्के पाणी वाया जाते. त्यामुळे मुंबईला दिवसाला फक्त २,९०० दशलक्ष लिटरच पाणीपुरवठा होतो. पाणी चोरी व गळती रोखण्यात जल विभागाला यश आलेले नाही. वेळेत पाणी न येणे, कमी दाबाने पाणीपुरवठा करणे या गोष्टी सर्रास सुरु आहेत. मुंबईत पाणी चोरी व गळती रोखण्यासाठी प्रशासन वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च करते, तरीही हे प्रमाण थांबत नसल्याचे पालिका प्रशासनाने मान्य केले आहे.

सुमारे ४० हजार खासगी टॅकर सक्रीय

महापालिकेच्या टँकरची संख्या सुमारे ९ हजार १८१ आहे, तर खासगी टँकरची संख्या सुमारे ३९ हजार ९९९ एवढी आहे. काही खासगी टँकर मुंबईत सक्रीय आहेत. सर्वाधिक पाण्याची लूट गोवंडी- मानखुर्द, अंधेरी पश्चिम, वडाळा, रे रोड, विक्रोळी, घाटकोपर, साकीनाका, कांदिवली, मालाड, गणपत पाटील नगर, दहिसर येथील झोपडपट्ट्यात केली जात आहे. येथे पुरेसा पाणी पुरवठा करण्याची मागणी या भागातील नागरिक करीत आहेत.

मुंबईत पाणी गळती, चोरी होत असल्याने ३५ टक्के पाणी वाया जाते, असे पालिकच्या अधिका-यांकडूनच सांगितले जाते. अनधिकृतपणे पाणी विकणा-यांची साखळी आहे. हे प्रमाण फक्त झोपडपट्टीतच नाही, तर मोठी व्यापारी संकुले, इंडस्ट़्रीजना विकले जाते. प्रशासनाचे संबंधित अधिकारी व दलाल यांचे संगनमत असल्याने हे प्रकार खुलेआम होत असतात. झोपडपट्टयांतील गरिबांना मागणी करुनही पाणी जोडण्या मिळत नाहीत. सर्वांना पाणी मिळाले पाहिजे.

- सिताराम शेलार, निमंत्रक, पाणी हक्क समिती

मुंबईत पालिकेच्या टॅंकरची संख्या - ९ हजार १८१

खासगी टॅंकरची संख्या - ३९ हजार ९९९

मुंबईला दररोज होणारा पाणी पुरवठा - ३,८०० दशलक्ष लिटर

वाया जाणारे पाणी - ९०० दशलक्ष लिटर

प्रत्यक्ष होणारा पाणी पुरवठा - २,९०० दशलक्ष

दलालांचा पाण्याचा दर

१००० लिटर पाणी - ५०० ते ७०० रुपये

१ लिटर पाणी - १ रुपये

पालिकेचा दर - १००० लिटर पाणी - ५ रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com