esakal | Mumbai : ‘एनसीबी’ने त्या तिघांना का सोडले?
sakal

बोलून बातमी शोधा

Nawab-Malik-NCP

Mumbai : ‘एनसीबी’ने त्या तिघांना का सोडले?

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

मुंबई : आलिशान क्रुझवरील ड्रग्ज पार्टीत सहभागी असलेल्या तेराशे लोकांपैकी केवळ अकराजणांना ‘एनसीबी’ने ताब्यात घेतले होते मात्र त्यातील तीन जणांना त्यांनी का सोडले? असा सवाल करतानाच रिषभ सचदेवा हा भाजपचे नेते मोहित कंभोज यांचा मेहुणा असल्याने त्याला सोडण्यात आल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केला.

मलिक यांनी ६ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला होता. त्यांनी आज भाजप युवा मोर्चाचे मोहित कंभोज यांच्या मेहुण्याला एनसीबीने ताब्यात घेऊनही सोडण्यात आल्याचा व्हिडिओ सादर करत खळबळ उडवून दिली. रिषभ सचदेवा, प्रतीक गाभा, अमीर फर्निचरवाला या तिघांना ताब्यात घेताना आणि ते त्यांच्या नातेवाइकांसोबत एनसीबीच्या कार्यालयातून बाहेर पडतानाचा व्हिडिओही मलिक यांनी माध्यमांसमोर आणला. क्रुझवर १३०० लोकांवर धाड टाकण्यात आली. ही कारवाई बारा तास सुरू होती. त्यातील ११ लोकांना ताब्यात घेण्यात आले होते त्यानंतर अकरा जणांना एनसीबीच्या कार्यालयात आणले. परंतु त्यापैकी तीन लोकांना सोडण्याचा आदेश दिल्लीतील नेत्यांनी दिल्याचा खळबळजनक आरोपही नवाब यांनी यावेळी केला.

हा ठरवून केलेला फर्जीवाडा

क्रुझवरील धाड ठरवून केलेला फर्जीवाडा होता. सेलिब्रिटींना बोलावून त्यांना अडचणीत आणण्याचा हा प्रकार होता. त्यामुळे एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी त्या तिघांना का सोडले आणि कुणाच्या सांगण्यावरून सोडले याचा खुलासा करावा अशी मागणीही मलिक यांनी केली आहे.रिषभ सचदेवा याला बाहेर सोडताना त्यांचे वडील आणि काका सोबत होते. या तीन व्यक्तींचे नातेवाईक एनसीबीच्या कार्यालयात आले कसे? त्यामुळे रिषभ सचदेवाचे वडील आणि काका व झोनल अधिकारी समीर वानखेडे यांचे मुंबई पोलिसांनी कॉल डिटेल्स चेक केले तर संपूर्ण सत्य बाहेर येईल असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा: Mumbai : कर्मचारी वाढवूनही विमानतळावरील प्रवाशांची गर्दी कायम

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे

केंद्रातील भाजप नेत्यांच्या दबावाखाली तिघांना सोडण्यात आले आहे. एनसीबीच्या कारवाईत सुरुवातीपासून भाजपचे कनेक्शन होते हे सिद्ध झाले आहे. हे सगळे न्यायालयात सिद्ध होईलच परंतु जनतेच्या न्यायालयातही आले पाहिजे म्हणून हे प्रकरण मांडले असेही त्यांनी सांगितले. दरम्यान हे प्रकरण गंभीर असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यामध्ये लक्ष द्यावे अशी मागणीही मलिक यांनी यावेळी केली.

‘संबंध नसल्याने त्यांना सोडले’

‘राष्ट्रवादी’चे नेते नवाब मलिक यांच्या आरोपानंतर अमली पदार्थ नियंत्रक विभागाने (एनसीबी) आज पत्रकार परिषद घेऊन त्याचे खंडन केले. ‘एनसीबी’च्या म्हणण्यानुसार एकूण १४ इसमांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यात ६ जणांना सोडण्यात आले. त्यांचा या रेव्ह पार्टीशी काहीच संबंध नव्हता म्हणून त्यांना सोडल्याचा खुलासा तपास संस्थेकडून करण्यात आला. ‘एनसीबी’वर होणारे आरोप हे बिनबुडाचे असून हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे असेही सांगण्यात आले. दरम्यान ‘एनसीबी’चे पथक आता शाहरुख खान याच्या वाहनचालकाची चौकशी करणार असल्याचेही समजते.

राष्ट्रवादीचे मंत्री नबाब मलिक यांनी केलेल्या आरोपानंतर ‘एनसीबी’चे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, ताब्यात घेतलेल्या १४ जणांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. आर्यन खान याच्यासह ८ लोकांना अटक करण्यात आली तर इतर ६ जणांना सोडण्यात आले. पुढे चौकशीसाठी आवश्यक वाटल्यास त्यांना पुन्हा बोलाविण्यात येईल. क्रूझ रेव्ह पार्टीतील ऑपरेशनमध्ये तब्बल ९ साक्षीदारांचा सहभाग होता त्यात मनीष भानुशाली आणि किरण प्रकाश गोसावी यांचा समावेश होता.’’

loading image
go to top