Mumbai: तरुणीच्या मदतीला धावलेल्या दोघा तरुणांना मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Mumbai: तरुणीच्या मदतीला धावलेल्या दोघा तरुणांना मारहाण

डोंबिवली - एका तरुणीला रस्त्यात एक मुलगा शिवीगाळ करीत मारहाण करीत असल्याने तिला वाचविण्यासाठी दोघे तरुण गेले. यावेळी छेड काढणाऱ्या मुलाने त्याच्या 7 ते 8 तरुणांना बोलावून दोघा तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण पश्चिमेतील मंगेशी पॅराडाईज परिसरात घडली.

योगेश चौधरी व उत्कर्ष सिंग अशी दोघा जखमी तरुणांची नावे असून त्यांच्यावर पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी प्रणव कोनकर, दर्शन कोनकर यांसह अनोळखी इसमांविरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण पश्चिमेत मंगेशी पॅराडाईज परिसरात योगेश व त्याचा मित्र उत्कर्ष राहातो. शुक्रवारी रात्री 8.30 च्या दरम्यान योगेश व त्याचा मित्र इमारतीच्या परिसरात फिरत होते. यावेळी तेथे प्रणव हा एका तरुणीला शिविगाळ करत मारहाण करत होता.

यावेळी योगेश व त्याच्या मित्राने त्या तरुणाला त्याबाबत विचारणा केली. याचा राग आल्याने प्रणवने याने त्याच्या मित्रांना तेथे बोलावून घेतले. या सर्वांनी योगेश आणि उत्कर्ष या दोघांना लाकडी दांडक्याने आणि बॅटने बेदम मारहाण केली.

यामध्ये योगेश याच्या डोक्याला मार लागला आहे, उत्कर्षच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या दोघांवर रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत. योगेश याच्या तक्रारीवरुन प्रणव, दर्शन व त्याच्या साथीदारांविरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणीची व प्रणवची ओळख होती त्यातून त्यांच्यात वाद झाला होता. तरुणीच्या तक्रारीवरुन देखील खडकपाडा पोलिस ठाण्यात प्रणव विरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडकपाडा पोलिसांनी आत्तापर्यंत पाच जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.