
Mumbai : वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला प्रकरणात भोईवाडा पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद
मुंबई : वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला प्रकरणात भोईवाडा पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. भोईवाडा पोलिसांनी या प्रकरणी कलम 326 , 307 हत्येचा प्रयत्न अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला असून या प्रकरणी अद्याप कोणलाही अटक झालेली नाही.
वंचित बहुजन युवक आघाडी मुंबई अध्यक्ष परमेश्वर रणशूर आणि वॉर्ड अध्यक्ष गौतम हराळ यांच्यावर शनिवारी 27 मेला प्राणघातक हल्ला करण्यात आला. दादरमधील आंबेडकर भवन परिसरात झालेल्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली मुंबईत वंचित बहुजन आघाडीची सभा होणार आहे.
त्यासाठी शनिवारी आंबेडकर भवन दादर येथे वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेशच्या कार्यकर्त्यांची शनिवारी बैठक होती. त्याला कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात आले होते. तेव्हा सायंकाळी परमेश्वर रणशूर आणि गौतम हराळ यांच्यावर चार अज्ञात व्यक्तींनी लोखंडी रॉड, आणि तलवार, चॉपरने जीवघेणा हल्ला केला.
हल्ल्याचा निषेध करताना हा हल्ला परमेश्वर आणि रणशूर यांच्यावरील हल्ला नसून हा आंबेडकर भवनावरील हल्ला असल्याचा पवित्रा वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपशब्द बोलून आंबेडकर घराण्यासंबंधी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या जगदीश गायकवाड यांच्याकडे संशयाची सुई आहे.