मुंबईतील शंभर डॉक्‍टरांचे पथक पूरग्रस्त भागांत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

सांगली, कोल्हापूर या पूरग्रस्त भागांतील नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी शुक्रवारपासून शंभरहून अधिक डॉक्‍टर्स कार्यरत झाले आहेत.

मुंबई : सांगली, कोल्हापूर या पूरग्रस्त भागांतील नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी शुक्रवारपासून शंभरहून अधिक डॉक्‍टर्स कार्यरत झाले आहेत.

पालिकेच्या डॉक्‍टरांसह काही खासगी रुग्णालयातील डॉक्‍टरांनीही पूरग्रस्त भागांतील आरोग्य शिबिरात सहभाग नोंदवला आहे. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र व कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे खासगी डॉक्‍टरांच्या पथकाचा समन्वय साधत आहेत. सध्या कोल्हापुरात व सांगलीत डॉक्‍टरांचे पथक कार्यरत आहे. परिस्थितीचा अंदाज घेत भायखळ्यातील जे.जे. रुग्णालयातील डॉक्‍टरांची टीमही पूरग्रस्त भागात पाठवली जाणार आहे.

यासह भायखळ्यातील जे.जे. रुग्णालयाने दोन ट्रक भरून आवश्‍यक औषधांचा साठा पूरग्रस्त भागांत पाठवला आहे. जुलाब, अतिसार, कॉलरा या आजारांसह सलाईन्स; तसेच अनेक आजारांवर उपयोगी मेट्रोजिल औषधेही उपलब्ध करण्यात आली आहे. जनावरांचे मृतदेह, चिखलाचे ढीग यामुळे संभाव्य संसर्गाच्या आजारांचा धोका लक्षात घेत ऑगमेंटीन औषधदेखील पाठवण्यात आल्याची माहिती जे.जे. समूह रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली. परिस्थितीचा अंदाज घेतल्यानंतर वैद्यकीय, रोगप्रतिबंधक शास्त्र, मनोविकारतज्ज्ञ आदी डॉक्‍टरांची टीम पाठवली जाईल, असेही डॉ चंदनवाले म्हणाले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MUMBAIKARS DOCTOR GOING TO FLOOD AREA OF KOLHAPUR AND SANGALI