'मुंबईकरांसमोर जगण्याचे असंख्य प्रश्न पण मुंबईचे सत्ताधारी...' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav-Thackeray-Ashish-Shelar

'मुंबईकरांसमोर जगण्याचे असंख्य प्रश्न पण मुंबईचे सत्ताधारी...'

भाजपच्या आशिष शेलारांचा मुंबई पालिकेवर, मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुंबई: गेल्या काही महिन्यांत राज्यातील कोरोना कमालीचा आटोक्यात आला आहे. दररोज सापडणारी रूग्ण संख्या प्रचंड कमी झाली आहे. असे असतानाही उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचा लॉकडाउन काही केल्या संपायचा नाव घेत नाहीये. दोन आठवड्यांसाठी विविध स्तरांप्रमाणे दुकाने, मॉल्स आणि इतर आस्थापने उघडण्याची परवानगी देण्यात आली. पण त्यानंतर मात्र सारं काही स्थिरस्थावर होत असताना पुन्हा एकदा राज्यभरात कठोर निर्बंध लागू करण्यात आले. नुकताच एका युवकाचा ट्रेनचे तिकीट नसल्यामुळे दंड भरावा लागणारा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावरून सध्या राज्यातील सर्वसामान्यांची काय अवस्था आहे, याची साऱ्यांनाच कल्पना येऊ शकते. अशातच मुंबईतील लोकांना समुद्राचे पाणी प्रक्रिया करून पिण्यायोग्य करून देण्यासाठी पालिकेने एका कंपनीला कंत्राट दिले. या मुद्द्यावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुंबई पालिकेला चांगलंच सुनावलं.

लॉकडाउनमुळे सध्या लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न उपस्थित होत आहे पण मुंबई पालिका प्रशासन मात्र कंत्राटांची खैरात वाटण्यात मग्न आहे, अशी टीका शेलार यांनी केली. 'कोरोनातून जीव वाचेल का? कामाला जाता येईल का? पगार मिळेल का? चूल पेटेल का? लॉकडाऊन संपेल का? मुंबईकरांसमोर जगण्याचे असे असंख्य प्रश्न तर मुंबईचे सत्ताधारी कंत्राटांची खैरात वाटण्यात मग्न! लुटमार!! कधी नाल्यातील गाळाच्या नावाने तर आता समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या बहाण्याने!', अशा शब्दांत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मुंबई पालिकेतील शिवसेनेच्या सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान, मुंबईतील मनोरी येथे प्रस्तावित असलेल्या समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाचा विस्तृत अहवाल तयार करण्यासाठी आज महानगर पालिका आणि इस्त्राईली कंपनीत करार झाला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थीतीत हा करार झाला असून धरणांसाठी पर्याय म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. 2025 पासून या प्रकल्पातून मुंबईला शुध्द पाण्याचा पुरवठा सुरु होईल असा विश्‍वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मनोरी येथे महानगर पालिका समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारणार आहे. पहिल्या टप्प्यात दिवसाला 200 दशलक्ष लिटर पिण्याचे पाणी तयार केले जाणार असून आवश्‍यकतेनुसार हा प्रकल्प 400 दशलक्ष लिटर पर्यंत वाढविण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी महानगर पालिकेने इस्त्राईलच्या आय.डी.ई वॉटर टेक्नोलॉजी या कंपनीची नियुक्ती केली आहे.