मुंबईचे मैलापाणी देशी कंपन्या शुद्ध करणार; लवकरच कंत्राटदार निश्‍चितीची प्रक्रिया

समीर सुर्वे
Monday, 19 October 2020

मुंबईतील मैला पाण्यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प टप्प्यात आले असून, लवकरच यासाठी कंत्राटदार निश्‍चित करण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. विशेष म्हणजे या निविदा प्रक्रियेत देशी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली असून, याबाबत पालिका प्रशासनाची प्राथमिक बैठकही पार पडली आहे.

मुंबई : मुंबईतील मैला पाण्यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प टप्प्यात आले असून, लवकरच यासाठी कंत्राटदार निश्‍चित करण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. विशेष म्हणजे या निविदा प्रक्रियेत देशी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली असून, याबाबत पालिका प्रशासनाची प्राथमिक बैठकही पार पडली आहे.

सर्व महिलांना लोकल प्रवासास अजूनही परवानगी का नाही ? समोर आलं खरं कारण

मुंबईत महापालिका सात ठिकाणी मलजलावर प्रक्रिया करणारे पम्पिंग स्टेशन बांधणार आहे. या पम्पिंग स्टेशनमध्ये प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त अन्य कामासाठी करण्यात येणार आहे. भविष्यात पिण्यासाठीही या पाण्याचा वापर करता येईल, अशा क्षमतेचे हे पम्पिंग स्टेशन तयार करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. पालिकेने गेल्या दहा वर्षांपासून हे पम्पिंग स्टेशन उभारण्याचा आराखडा तयार केला आहे. मात्र कधी कंत्राटदार न मिळाल्याने तर कधी नियमावलीत बदल झाल्याने हे प्रकल्प प्रत्यक्षात रखडले होते. मात्र आता पुढील पाच वर्षांत हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने काम सुरू होण्याची शक्‍यता आहे. हे प्रकल्प मोठे असल्याने परदेशी कंपन्या निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याची शक्‍यता होती. मात्र निविदापूर्व बैठकीत देशी कंपन्यांनी सहभाग नोंदवला आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. 

रेमडेसिवीर कोरोनासाठी कुचकामी! जागतिक आरोग्य संघटनेचा निष्कर्ष

50 टक्के पाण्याचा पिण्याव्यतिरिक्त वापर 
मुंबईत रोज 2 हजार 800 दशलक्ष लिटर मैला पाणी निर्माण होतो, तर कुलाब्यासह आठ पम्पिंग स्टेशनमध्ये रोज 2 हजार 333 दशलक्ष लिटर पाणी जमा होणार आहे. या पाण्यावर तृतीय स्तराची प्रक्रिया केली जाणार असून, 50 टक्के पाणी पिण्याव्यतिरिक्त वापरासाठी वापरण्यात येईल; तर उर्वरित पाणी नैसर्गिक स्त्रोतात सोडण्यात येणार आहे. 

मैला पाण्यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प टप्प्यात आले असून, याबाबत निविदापूर्व बैठक पार पडली आहे. संबंधितांच्या काही शंका होत्या. त्यावर निर्णय घेण्यात येत आहे. 
- अतुल राव, मुख्य अभियंता, मलनिस्सारण प्रकल्प, मुंबई. 
 

असे आहेत पम्पिंग स्टेशन 
ठिकाण                  प्रकल्पाची क्षमता (दैनंदिन दक्षलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया) 
धारावी                                                         250 
वरळी                                                          500 
वांद्रे                                                              60 
वर्सोवा                                                         180 
मालाड                                                        454 
घाटकोपर                                                    337 
भांडुप                                                         215 
-----------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai's sewage will be purified by domestic companies; Procedure for contractor confirmation soon