मुंबईतील वन्यजीवसृष्टीचे वैभव एका क्लिकवर! मुंबईचा जैवविविधता नकाशा तयार

मुंबईतील वन्यजीवसृष्टीचे वैभव एका क्लिकवर! मुंबईचा जैवविविधता नकाशा तयार

मुंबई : मुंबईत आता गरुड-गिधाडे नसली तरी समुद्रात डॉल्फिन, हॅमरहेड मासा, करवती तोंडाचा मासा असे वेगवेगळे दुर्मिळ सागरीजीव आहेत. बिबट्या, उदमांजर, अजगर अशा लुप्त होत जाणाऱ्या प्रजाती आहेत. जरा शेजारी वसई परिसरात ऑलिव्ह रिडले कासवे आहेत, कर्नाळा अभयारण्याजवळ गरूड आहेत, हे मुंबई परिसरातील सारे वन्यजीवसृष्टीचे वैभव एका क्लिकवर आले आहे. 

निसर्गप्रेमी रोहन चक्रवर्ती यांनी बरीच मेहनत घेऊन हा जैवविविधता नकाशा तयार केला आहे. मुख्य म्हणजे केवळ माहिती देणे हाच यामागील हेतू नाही तर सर्वांनी या वन्यजीवांचे संरक्षण करावे या हेतूने त्यांची ही धडपड सुरु आहे. मुंबईतील वन्यजीव आता हळुहळू कमी होत चालले आहेत, तरी चक्रवर्ती यांनी पार विरारपुढील वैतरणा खाडीपर्यंत तसेच पनवेलपुढील कर्नाळा पक्षीअभयारण्यापर्यंतच्या जीवसृष्टीचा आढावा घेतला आहे.  हा अनोखा नकाशा ‘बायोडायव्हर्सिटी बाय द बे’ या अभियानासाठी तयार करण्यात आला आहे. जैवविविधता जपण्यासाठी स्थापन केलेल्या मिनिस्ट्री ऑफ मुंबईज मॅजिक तर्फे हे अभियान सुरू झाले आहे. यामध्ये वन्यप्राण्यांची वसतिस्थाने, तिवरांची वने, शहरातील पाणथळ व हरित जागा आणि शहरात दिसणाऱ्या 90 हून अधिक वन्य प्रजाती दाखवलेल्या आहेत. रानटी पद्धतीच्या विकासामुळे धोक्यात आलेल्या मुंबईच्या जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी मुंबईकरांनी कृती केली पाहिजे यावर भर देण्यासाठी हा नकाशा आहे.

लाल-तपकिरी खेकडे, पवई तलावातील मगरी, चितळ, सरडे, साप, समुद्रीसाप, बेडूक, माकडं, हरणं, कोळी, विंचू, दोन प्रकारचे सी इगल, इल मासा, ऑक्टोपस, सँडपायपर पक्षी, हिवाळ्यात पाहुणे येणारे फ्लेमिंगो अशी समृद्ध जीवसृष्टी मुंबईत आहे. ही माहिती मुंबईकरांना देऊन हा नैसर्गिक वारसा जपण्याचे आवाहन करणार आहे. या जीवांबरोबरच आपले सहजीवन फुलेल याची माहितीही देणार आहे, असे रोहन चक्रवर्ती म्हणाले. 

या मोहिमेसाठी अनेक तरुण मुंबईकर एकत्र आले असून ही जैवविविधता जपण्यासाठी प्रशासनाशी संवाद साधला जाईल. यासंदर्भात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनाही पत्र लिहून आवाहन केले जाणार आहे. फ्लेमिंगोंच्या वसतिस्थानांचे संरक्षण करणे, आरेला जंगल म्हणून मान्यता देणे, कोळी समाजाच्या उपजीविकेसाठी धोरण तयार करणे आणि मुंबईत उद्याने विकसित करणे व त्यांचे संरक्षण करणे अशी पाच कलमी कृती योजना तयार करण्याचे आवाहन ठाकरे यांना केले जाईल.

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com